Breaking News

डॉ. कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल पनवेल विद्यालयात जयंती उत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132 वी जयंती रविवारी (दि. 22) न्यू इंग्लिश स्कूल, मार्केट यार्ड, पनवेल या विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळी विद्यालयाचे व्हाईस चेअरमन पनवेल पालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक व लाईफ वर्कर आर. पी. ठाकूर व सर्व सेवक यांनी प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर परेश ठाकूर यांनी कर्मवीर आण्णांच्या पालखीस खांदा देऊन पालखी मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली. ही मिरवणूक पनवेल शहरातून उरण नाका, टपाल नाका, कृष्णाळे तलाव, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, छत्रपती शिवाजी चौक, पंचरत्न हॉटेल या मार्गे काढण्यात आली. या मिरवणुकीची सांगता न्यू इंग्लिश स्कूल येथे झाली.

महात्मा फुले महाविद्यालयातर्फे कर्मवीरांना मानवंदना

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132 वी जयंती रविवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त आद्याक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळ असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सामान्य विद्यार्थ्यांसाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करत, कमवा व शिका ही योजना सुरू करून शिक्षणक्षेत्राला नवी दिशा देणारे शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 132 व्या जयंतीनिमीत्त पनवेल परिसरामध्ये महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे कर्मवीर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली पनवेल शहरातील कर्मवीर भाऊ पाटील यांच्या पुतळ्याजवळ आली तेव्हा उपस्थित मन्यवरांची कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुप्षहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या वेळी भाजपेच पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, कामगार नेते महेंद्र घरत, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश ठाकूर, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यपक आर. पी. ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी महात्मा फुले महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

कर्मवीर जयंतीनिमित्त गव्हाण परिसरात पालखी मिरवणूक

गव्हाण : रामप्रहर वृत्त

येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 132व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक गव्हाण, शिवाजीनगर, कोपर परिसरातून काढण्यात आली.

विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन, तसेच संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी सोबत स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, प्राचार्या साधना डोईफोडे, उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, सर्व सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कर्मवीर अण्णांच्या जयजयकाराने दुमदुमलेला आसमंत आणि पारंपरिक वेशभूषा करुन ढोल ताशाच्या तालावर, लेझीम आणि झांज पथकाच्या बहारदार पदलालित्याने थिरकणार्‍या विद्यार्थिनी या मिरवणुकीचे आकर्षण ठरल्या. गावागावांतील अनेक महिलांनी वाटेत अण्णांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन केले. विद्यालयाचे प्रयोगशाळा प्रमुख रवींद्र भोईर यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने मिष्टान्नाची सोय केली, तसेच प्रा.राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या झांज पथकाच्या शिस्तबद्ध पदलालित्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कर्मवीर जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 25) संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सभा व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

जासई हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती

उरण : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जयंती सोहळा रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय जासई येथे रविवारी (दि. 22) उत्साहात साजरा करण्यात आला.

जासई विद्यालयाच्या आवारात असलेल्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. त्यानंतर हायस्कूलपासून जासई गावात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णांच्या जयघोषाच्या घोषणा देत पालखी मिरवणूक जासई गावात फिरविण्यात आली. या वेळी उरण पंचायत समितीचे सभापती नरेश घरत, कामगार नेते सुरेश पाटील, शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

डी. डी. विसपुते महाविद्यालयात कर्मवीर जयंती

पनवेल : रामप्रहर वृत्त

पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132 वी जयंती व शिक्षणमहर्षी बापूसाहेब डी. डी. विसपुते यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त नवीन पनवेल येथील डी. डी. विसपुते महाविद्यालयात युवा संवाद व आदर्श माहेर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत आदर्श समूहाच्या कार्यप्रणालीचे कौतुक करत भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132 वी जयंती व शिक्षणमहर्षी बापूसाहेब डी. डी. विसपुते यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त डी. डी. विसपुते महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व बापूसाहेब यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले, तसेच इंग्रजी माध्यमात विशेष गुणवत्तापूर्ण काम करणार्‍या शिक्षिकांना आदर्श माहेर पुरस्काराने, तसेच संस्थेतील विशेष पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री माया जाधव, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते, बी.एड्. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे, ग्रामपंचायत विचुंबेचे विविध पदाधिकारी, विविध शाळांचे शिक्षक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

वाशीमध्ये कर्मवीरांना आदरांजली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त 

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आणि मॉडर्न स्कूल वाशी यांच्या वतीने पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या132 व्या जयंती कार्यक्रमाचे रविवारी (दि. 22) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई पाटील स्मृती पुरस्कार देवून थोर समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा रयतचे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा सोहळा रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

या कार्यक्रमास सी.डी.सी. सदस्य अ‍ॅड. पी. सी. पाटील, रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य दशरथ भागत, रामन मॅगेसेसे पुरस्कार विजेते डॉ. भारत वाटवाणी, डॉ. कर्मवीर जयंती सप्ताहाचे प्रमुख डी. जी. बोटे, सर्व उपप्राचार्य सी. डी. भोसले, एस. एस. पाटील, डॉ. शुभदा नायक, रयत शिक्षण संस्थेचे शुभचिंतक व विद्यार्शी बहुसंखेने उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कर्मवीर व रयत माउली स्मृती पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे महान शैक्षणिक व समाज कार्य करणार्‍या दाम्पत्याला बहाल होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची नात जयश्रीताई चौगुले यांनी अध्यक्षीय भाषणात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारधनावर विशेष भर देऊन, सतत कार्यरत असणारी व्यक्ती कर्मवीर असते, असे मत व्यक्त केले.

रिटघर विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त

रविवार (दि. 22) रोजी श्री. भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय -रिटघर येथे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयातील स्थानिक स्कूल कमिटी सदस्य धर्मा झिमा भोपी, राजेश पांडुरंग भोपी व माजी विद्यार्थी संघ उपाध्यक्ष प्रल्हाद गुलाब भोपी, प्राचार्य बी. एस. नाईक यांच्या हस्ते करून, लेझीम व ढोल-ताशाच्या गजरात विद्यालयाच्या परिसरात कर्मवीरांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

या वेळी विद्यालयातील सर्व सेवक वर्ग आणि विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळी घोषवाक्ये तयार करून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. शेवटी विद्यालयाच्या

प्रांगणात कर्मवीरांच्या पालखीची आरती केली. या आरतीमध्ये सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला होता.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply