Breaking News

नवी मुंबई शहरावर 1605 कॅमेर्‍यांतून वॉच

बेलापुरमधून सीसीटिव्ही लावायला सुरुवात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई महापालिकेत बहुचर्चित असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे काम दृष्टीक्षेपात आले आहे. नवी मुंबईत प्रवेश करणार्‍या प्रत्येकावर व शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या हालचालींवर 1605 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार असून पालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावरील नियंत्रण कक्षाचे कामही अंतिम पूर्ण करण्यात आले आहे. बेलापूर विभागापासून सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यास सुरवात झाली आहे. लवकरच शहरावर व सार्वजनिक ठिकाणच्या बारीक हालचालीवर तिसर्‍या डोळ्याची नजर राहणार असून नवी मुंबईकरांच्या सुरक्षितेमध्ये अधिक वाढ होणार आहे. शहरात पोलीसांबरोबर सर्वेक्षण पूर्ण करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. बेलापूर विभागात कॅमेरे लावण्यास सुरवात झाली आहे. पुढील काही महिन्यात संपूर्ण शहर 1605 सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या नजरेत येणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरावर तिसर्‍या डोळ्याची नजर राहणार आहे. मेसर्स टाटा अँडव्हान्स सिस्टम लिमिटेड यांच्याकडून शहरात वेगात कामाला सुरवात झाली असून पुढील दोन महिन्यातच हे काम पूर्ण करण्याचा पालिकेचा व ठेकेदाराचा प्रयत्न आहे.ठेकेदाराला मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील 282 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, परंतु शहरातील सर्वच विभागात महत्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महापालिका जवळजवळ 148 कोटी रुपये खर्चातून अत्याधुनिक पध्दतीने शहर तिसर्‍या डोळ्याच्या नजरेत आणणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका व्याप्त हद्दीतील महत्वाची निवडक ठिकाणे, नवी मुंबई शहरातील प्रवेशद्वारे, मुख्य चौक, मार्केट, बस डेपो, रेल्वेस्थानकाबाहेरील परिसर तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी देखरेखीसाठी शहरातील मुख्य रस्ते याठिकाणी पालिकेने 2012 रोजी 282 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते, परंतू आयटी उपकरणे यांचे आयुर्मान पाच वर्ष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात 1605 अत्याधुनिक नवीन कॅमेरे बसविण्यात येत आहेत. याबाबतचा प्रस्ताव मागील अनेक वर्षापासून लालाफितीत व दरांवरुन अडखळत पडला होता, परंतु तत्नकालिन पालिका आयुक्त यांच्या काळात या कामाला कार्यादेश मिळाला त्यामुळे आता आयुक्त नार्वेकर यांच्या कार्यकाळात हे काम प्रत्यक्षात येणार आहे. मुंबई शहरात प्रवेश करण्यात येणार्‍या ऐरोली मुलुंड उड्डाणपुल, ठाणे दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोल नाका, बेलापूर किल्ले गावठाण व बेलपाडा अशा सर्वच प्रवेशद्वारावर तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कॅमेरे लावण्यात येत आहेत.
शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या कामात शहराच्या प्रत्येक प्रवेश निर्गमन जागेवर हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच शहरात येणार्‍या वाहनाबाबतची माहिती ठेवण्यासाठी स्वयंचलित पध्दतीने नंबर प्लेट्स वाचण्यासाठी एएनपीआर कॅमेरे बसविण्यात येत आहेत तसेच शहरातील 27 मुख्य चौकांसाठी 108 कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सर्व बसडेपो, मार्केट, उद्याने, मैदाने, पालिका कार्यालये, वर्दळीची ठिकाणे, चौक, नाके, मर्मस्थळे ही सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या कक्षेत येणार आहेत. तसेच शहरातील वर्दळीचे पामबीच मार्ग, ठाणे बेलापूर रोड, पालिका हद्दीतील सायन पनवेल रोड येथे हायस्पिड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील 43 ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉलबॉक्सची सोय असणार आहे.त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मागणीनुसार देशविघातक व घातपात कृत्यावर लक्ष ठेवण्यासाठी खाडी व समुद्र किनारे अशा नऊ ठिकाणी थर्मल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आठ ठिकाणी स्थानिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच नवी मुंबई महापालिका मुख्यालय केंद्रिय नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालय यांच्याशी जोडण्यात येणार आहे. या कामाचा डेटा सेंटर पोलीस मुख्यालय असेल तसेच ते पालिकेकडेही पहिल्या मजल्यावर तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात असणार आहे. पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालय किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये विभागीय चित्रीकरण असणार आहे. त्यामुळे एखाद्या विभागात घटना घडली तर ती नजीकच्या पोलीस स्थानकातही पाहता येणार आहे. रेड लाईट व्हायलेन्सन म्हणजेच सिग्नल तोडणार्‍या वाहनचालकांच्यावर नजर ठेवण्यासाठी देखरेखीसाठी 96 कॅमेरे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनाही वाहतूक नियमांच्या शिस्तीचे पालन करावे लागणार आहेत. सीसीटीव्हीच्या 154 कोटीच्याकामासाठी 274 कोटींची निविदा आधी आली होती.त्यामुळे पालिका तत्कालीन आयुक्त बांगर यांनी ती निविदा प्रक्रियाच रद्द करुन नव्याने या कामासाठी निविदा मागवली होती. त्यामध्ये वजा 7.04 कमी दराने निविदा स्विकृती केल्यामुळे पालिकेचा अंदाजे 20 कोटीपेक्षा अधिक फायदा होणार आहे. संबंधित ठेकेदाराला नऊ महिन्यांची कामाची मुदत देण्यात आली असून 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती, परंतू पावसाळ्याच्या काळात खोदकामाला परवानगी नसल्याने या कामाला मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यातच संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती लोकसत्ताला दिली.

नवी मुंबई शहरात जवळजवळ 1605 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत असून संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे.सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण काम होणार आहे. पालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहे.तसेच बेलापूर विभागात कॅमेरे लावण्यास सुरवात करण्यात आली असून 100 पेक्षा अधिक कॅमेरे लावण्यात आली आहे. संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे.
-शिरीष आरदवाड,
सहाय्यक शहर अभियंता

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply