कर्जतमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीमधील वाद वाढला
कर्जत ः बातमीदार
रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे तसेच कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेले आरोप आणि अर्वाच्च भाषेतील वक्तव्याबद्दल कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. 29) निषेध करण्यात आला.
कर्जत येथे शासकीय इमारतीच्या भूमिपूजनावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांचे नाव न घेता मांजर आडवी गेल्याचा उल्लेख केला तसेच पालकमंत्रिपद आज आहे, कदाचित उद्या नसेलही, असे वक्तव्य केले. त्याचप्रमाणे सुरेश लाड यांनाही लक्ष्य केले होते. यावरून कर्जत येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित बैठकीत महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आमदार थोरवे यांचा निषेध केला. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.