पनवेल : प्रतिनिधी
तळोजा एमआयडीसी येथील एशियन पेन्टस पी.पी.जी प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्या 2021-22च्या सीएसआर निधीतून जनसेवा चॅरिटेबल सेंटरच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या कळंबोली कोविड समर्पित रूग्णालयास व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात दिले. हे व्हेंटिलेटर लहान मुलांनाही उपयुक्त आहे.
महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या प्रयत्नाने एशियन पेन्टस पी.पी.जी प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्या 2021-22च्या सीएसआर निधीतून जनसेवा चॅरिटेबल सेंटरच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या कळंबोली कोविड समर्पित रूग्णालयास व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात दिले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्तराज भोईटे, जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अविनाश खाटिक-पाटील उपस्थित होते.
यापूर्वी टाटा रुग्णालय, खारघर यांच्यामार्फत तीन व्हेंटिलेटर व तीस ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आणि फिटोलाईट कंपनीने पाच व्हेंटिलेटर कोविड रुग्णालय कळंबोली देणगी स्वरूपात दिले असून, उपजिल्हा रुग्णालयास टाटा रुग्णालयामार्फत तीन व्हेंटिलेटर, 10 कॉन्सेंट्रेटर देणगी स्वरूपात दिले आहे.
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांसाठी मोठा उपयोग होत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये सिडकोच्या माध्यमातून 72 खाटांचे कोविड समर्पित रूग्णालय महापालिकेस मिळाले आहे. सध्या या रुग्णालयात 61 रुग्ण उपचार घेत आहेत, तसेच उपजिल्हा रुग्णालयात 92 रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिका कार्यक्षेत्रातील कोविड रुग्णांना ही रुग्णालये वरदान ठरत आहेत.