पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आशा स्वयंसेविका स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देत आहेत. अशा सर्व स्वयंसेविकांचा महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात यावा, अशी महत्वपूर्ण मागणी महिला व बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर यांनी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
पनवेल महानगर पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या आशा स्वयंसेविका माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना कोरोनाची लक्षणे आहेत का याबाबत त्या माहिती घेऊन तसा अहवाल मनपाला सादर करतात. कोरोना या वैश्विक संकटाच्या काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून या आशा स्वयंसेविका फ्रंटलाईनला काम करीत आहेत. कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी ते सर्वेक्षण करतात. कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये त्यांनी गेल्या दीड वर्षामध्ये जे काम केले आहे ते अत्यंत उल्लेखनीय आहे.
कोविड विषाणूंचे संक्रमण होऊ नये यासाठी पुढे जाऊन काम करणार्या या सर्व स्वयंसेविकांचा पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात यावा, अशी महत्वपूर्ण मागणी महिला व बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर यांनी मंगळवारी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल त्याचबरोबर त्यांच्या कार्याचे जाहीरपणे कौतुक करता येईल, असे मत महानवर यांनी व्यक्त केले आहे.