पनवेल ः वार्ताहर
तळोजा सीईटीपी प्रकल्पाला काही दिवसांत वसुंधरा पुरस्कार मिळेलच, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. महाराष्ट्र शासनाने कारखाना मालकांना उघड्यावर टाकले नाही आणि टाकणारही नाही. काही नेमक्याच कंपन्या प्रदूषण करीत आहेत, पण त्यांचा ठपका संपूर्ण एमआयडीसीवर बसत आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. कारखानदारांना येणार्या समस्या आणि भेडसावणारे प्रश्न सोडविण्याचे काम आमचे सरकार करणार आहे. तेव्हा कारखानदारानी चिंता करण्याची गरज नाही, अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कारखानदारांना धीर दिला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल तळोजा टीएमएमध्ये कारखानदारांना भेडसावणार्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी देसाई बोलत होते. तळोजा औद्योगिक वसाहतीतील वाढत्या प्रदूषणाविरोधात राष्ट्रीय हरित लवादाने ठपका ठेवत प्रदूषण करणारे कारखाने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे कारखाना मालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कारखानदारांची सभा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील कारखान्यांतील प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली, तसेच मोदी सरकारने केलेल्या देशाच्या प्रगतीवर प्रकाशझोत टाकला. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरिष घरत, शिवसेना विभागप्रमुख गोविंद जोशी आदींसह कारखाना मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
