पाच टप्प्यांत निर्बंध होणार शिथिल; अधिसूचना जारी
मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (दि. 5) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. ही अधिसूचना 7 जूनपासून लागू होईल.
अनलॉक करीत असताना पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ या 10 जिल्ह्यांचा, दुसर्या स्तरात हिंगोली, नंदुरबार जिल्ह्यांचा दोन, तिसर्या स्तरात मुंबई आणि उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम या 15, चौथ्या स्तरात आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या स्तरात त्या जिल्ह्याचा समावेश केला जाईल. 20 टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि 75 टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्याच्या कार्यक्षेत्रात येणार्या प्रशासकीय पातळीवरील या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाईल.
* पाच टप्प्यांचे निकष
पहिला टप्पा
ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असतील.
दुसरा टप्पा
ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40च्या दरम्यान असेल.
तिसरा टप्पा
पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असतील.
चौथा टप्पा
ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्केदरम्यान असेल आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असतील.
पाचवा टप्पा
जेथे 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी असेल आणि 75 टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असतील.