Breaking News

मुंबईत पाणी भरून दाखवलं; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा शिवसेनेला टोला; नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल

मुंबई ः प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली. मुंबई महापालिका आणि शिवसेनेने मुंबईत पाणी भरून दाखवलं, अशा शब्दांत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेला सणसणीत टोला लगावला आहे.  मुंबईसह उपनगरात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येणार हे माहीत असूनही आणि हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतरही पालिकेने योग्य ती खबरदारी घेतली नाही. त्याचाच फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसला आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला. मुंबईत शिवसेनेने पाणी भरून दाखवलं आणि पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली. गेल्या वर्षी शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी सांगितले होते की, पुढील वर्षी जर पाणी भरले, तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील. आता त्यांनी सांगावे की मुंबईतील तुंबलेल्या पाण्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री की मुंबई महापालिका? पाणी भरण्यामागे नियोजनाचे अपयश ही मुख्य गोष्ट आहे. नियोजित प्रकल्पांची कामे पूर्ण झालेली नाहीत, असे रोखठोक मतही दरेकर यांनी मांडले. भरती आणि मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली, असे सांगितले जाते. या गोष्टी मुंबईसाठी नवीन नाहीत. गेली 20 ते 25 वर्षे मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी भरते. आता हवामान खात्यानेही अलर्ट दिला आहे. त्यामुळे किमान आता तरी मुंबई महापालिकेने त्वरित गतिमान कार्यशैली वापरावी आणि तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करून जनजीवन सुरळीत करावे, अशी मागणी दरेकर यांनी केली. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत बुधवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून, पुढील तीन दिवस मध्यम ते तीव स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply