महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील बोरगाव गावात असलेल्या दगड खाणीवर काम करणार्या एका कामगाराने आपल्या सहकारी कामगाराचा डोक्यात दगड घालून खून केला. आरोपी यानंतर पसार झाला असून महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड तालुक्यातील बोरगाव येथे असलेल्या दगड खाणीवर साहेबराव चव्हाण (मूळ रा. नागज, कवठेमहांकाळ) आणि महादेव पाटोळे (रा. चेरेवाडी, कवठेमहांकाळ, जि. सांगली) हे दोघेजण कामावर होते. एकाच ठिकाणी राहत असलेल्या या दोघांचा सोमवारी (दि. 15) रात्री वाद झाला. या वादातून महादेव पाटोळे याने साहेबराव चव्हाण याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये साहेबराव चव्हाण हा मृत पावला असून, पाटोळे पसार झाला आहे. महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गणपत निकम यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.