पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तथा उत्कर्ष मित्र मंडळाचे मार्गदर्शक अॅड. मनोज भुजबळ यांच्या माध्यमातून 350 नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. हे लसीकरण नवीन पनवेल येथील भुजबळ वाडीतील पनवेल महापालिकेच्या शाळेत आयोजित करण्यात आले होते. या वेळी नवीन पनवेल येथील यशोधन सोसायटी, चंद्रभागा सोसायटी, भागीरथी सोसायटी या तीनही सोसायटीतील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, तसेच सर्वसामान्य नागरिकांसह लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्या पत्रकारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचेही लसीकरण करण्यात आले.अॅड. मनोज भुजबळ यांनी सांगितले की, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून ही लसीकरण मोहीम आयोजित केली होती. सर्वप्रथम 250 लसी खरेदी करण्याचे ठरवले होते, परंतु त्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या नातेवाइकांचेही लसीकरण करण्याचा विचार मनात आला. पनवेल येथील लाइफलाइन हॉस्पिटलकडून लसी खरेदी करण्यात आल्या असून 18 ते 44 वयोगटातील 350 नागरिकांचे लसीकरण लाइफलाइन हॉस्पिटलच्या टीमने केले. प्रभागातील नागरिकांबरोबरच पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनीही या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. या लसीकरण मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच पनवेल शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनीही अॅड. मनोज भुजबळ यांचे आभार मानले. या लसीकरण मोहीमेसाठी उत्कर्ष मित्र मंडळाच्या सदस्यांनी मेहनत घेतली.