Sunday , February 5 2023
Breaking News

अभिनेता मयुरेश कोटकर यांना अटक

मंत्री एकनाथ शिंदेंसह ठाकरे सरकार ट्रोल

ठाणे ः प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली आहे. या संदर्भात राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक करण्यात आली आहे, मात्र या कारवाईमुळे मंत्री शिंदे यांच्यासह ठाकरे सरकारवर सोशल मीडियातून निशाणा साधला जात आहे.
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने राज्य सरकारला दिला आहे. यासाठी मंत्री एकनाथ शिंदे यांनी हालचाली केल्या होत्या तसेच दुसर्‍या एखाद्या प्रकल्पाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाईल, असे शिंदे म्हणाले होते. यावरून रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांतील भूमिपुत्र आक्रमक झाले असून विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी चारही जिल्ह्यांत नुकतेच भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अभिनेता मयुरेश कोटकर यांचाही सहभाग होता.
विमानतळ नामकरणावरून अभिनेता मयुरेश कोटकर यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. या संदर्भात शिवसेनेकडून श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी कोटकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. कोटकर यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, या प्रकारावरून भूमिपुत्र संतप्त झाले असून त्यांनी आपल्या तीव्र भावना सोशल मीडियातून व्यक्त केल्या आहेत. यामध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाकरे सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर ‘आय सपोर्ट मयूरेश कोटकर’ अशी मोहीमही विविध सोशल साईट्सवर जोरात आहे.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply