कर्जत ः बातमीदार
माथेरान घाटात शुक्रवारी (दि. 18) पहाटे दरड कोसळली. या दरडीमुळे सकाळच्या वेळी नोकरदार तरुण आणि विद्यार्थ्यांची काहीशी गैरसोय झाली, मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा माथेरान दौरा असल्याने सकाळीच दरड रस्त्यातून बाजूला करण्यात आली. माथेरानच्या दस्तुरी नाका येथून पुढे 200 मीटर अंतरावर असलेल्या चांगभले मंदिर भागात शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास दरड कोसळली. घाटात चांगभले मंदिर ते गार्बेट पॉइंट या भागातील रस्ता अरूंद आहे. त्याच भागात दरड कोसळल्याने तेथून चारचाकी वाहने जाणे बंद झाले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे शुक्रवारीच सकाळी 11 वाजता माथेरान दौर्यावर येणार होत्या. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जेसीबी मशीन लावून दरड रस्त्यातून बाजूला केली. या वर्षी पहिल्यांदाच माथेरान घाटात दरड कोसळली आहे. मागील 24 तासांत माथेरानमध्ये तब्बल 227 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळेच दरड कोसळली असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.