Breaking News

महाराष्ट्राला वाचविण्यासाठी रणशिंग फुंकणार : चंद्रकांत पाटील

अब तो स्पष्ट है ठाकरे सरकार भ्रष्ट है!

पनवेल ः प्रतिनिधी
महाराष्ट्रात घोटाळे आणि अत्याचार करण्याचे काम महाविकास आघाडी राज्य सरकारच्या माध्यमातून होताना दिसत असून, ठाकरे सरकार हे राज्याचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम करीत आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष, माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 26) येथे केली. त्याचबरोबर ’अब तो स्पष्ट है ठाकरे सरकार भ्रष्ट है’ असा नारा देत महाराष्ट्राला वाचविण्यासाठी रणशिंग फुंकावे लागेल, अशी घोषणाही त्यांनी केली.
 भारतीय जनता पक्षाच्या पनवेल तालुका व शहर मंडल शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून झाली. त्या वेळी पाटील मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रदेश सदस्य श्रीनंद पटवर्धन, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहेरे, विनोद साबळे, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर उपस्थित होते. बैठकीस लोकप्रतिनिधी आणि शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी पुढे मार्गदर्शन करताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना सन्मान दिला, मात्र ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ठाकरे सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना करुणा शर्मा यांचा टाहो का ऐकायला येत नाही आणि पूजा चव्हाणला न्याय का देत नाही? महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख तर पोलिसांना कशा प्रकारे खंडणी वसुली करायला सांगतात हे परमवीर सिंह यांनी आठ पानी पत्रातून जाहीर केले आहे, मात्र तरीसुद्धा हे सरकार गृहमंत्री आणि सचिन वाझेला वाचविण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करीत आहेत आणि हे संपूर्ण देश पाहत आहे. राज्यात कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव, महिलांवरील अत्याचार, सर्वसामान्यांचे बेहाल, गुन्हे-घोटाळ्यांमध्ये वाढ अशा चारही बाजूने या सरकारला अपयश आले आहे. अनिल देशमुख, सचिन वाझेला वाचविण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन कोटी स्वयंसेवक आहेत. कार्यकर्ते ध्वजाला वंदन करून समर्पण आणि गुरुदक्षिणा देतात. यातून तळागाळात सामाजिक कार्य केले जाते, पण हप्ता आणि खंडणी घेणार्‍यांना समर्पण आणि गुरुदक्षिणा काय कळणार, असा टोला पाटील यांनी नाना पटोले यांचे नाव घेत लगावला. त्याचबरोबर कोरोनात ‘मातोश्री’वर बसून गरम पाणी पिण्याचे सल्ले देणारे लोकांच्यात कधीच आले नाही, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारच्या अकार्यक्षमपणाच्या ठिकर्‍या उडविल्या.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून देशाला आणि देशातील प्रत्येक नागरिकाला आधार देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी किमान पाच कोटी लोकांना मदत पोहोचविण्याचे आवाहन देशातील कार्यकर्त्यांना केले होते. त्याला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या काळात उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या माध्यमातून मोदी किचनच्या माध्यमातून एक लाखहून अधिक नागरिकांना तयार अन्न, दीड लाखाहून अधिक लोकांना धान्याचे किट देण्याबरोबरच लोकांना त्यांना आधार देण्याचे काम केले गेले. कोरोना संकटकाळात जनतेची सेवा करण्यात भाजपचे कार्यकर्ते मागे राहिले नाहीत. भाजप एकीकडे काम करीत होता, तर अन्य पक्ष कामाऐवजी फक्त फोटोच काढत होते. लोकांची सेवा करीत असताना नगरसेवक संजय भोपी, बापू घारे, राजेंद्र बनकर यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. त्यांनी कोरोना काळात लोकांना केलेली मदत कधीही विसरता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
कोरोना संकटात भाजपकडून नागरिकांना आधार -आमदार प्रशांत ठाकूर
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रास्ताविकातून कोरोना काळात भाजपने सर्वसामान्यांसाठी केलेल्या कार्याचा अहवाल मांडला. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर नेत्यांनी लोकांपर्यंत जाऊन लोकांना मायेचा आधार दिला, मात्र राज्य सरकार नेहमीच निद्रिस्त राहिले आहे. कोरोनाच्या अतिकठीण काळात मी व आमदार महेश बालदी पीपीई किट घालून रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करीत होतो, लोकांना आवश्यक मदत करीत होतो, असे त्यांनी सांगितले. कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा अनेक प्रसंगात राज्यातील भाजपचे नेते प्रत्यक्ष गेले, मात्र राज्यातील मंत्री मदत न करता फक्त दिखावे करीत सुटले, असा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply