पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीसह इतर गुन्हे करणार्या सराईत चौकडीला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तळोजा परिसरातून ताब्यात घेतले. या आरोपींकडून आतापर्यंत सात लाख 41 हजार 500 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महागड्या लोखंडी प्लेट्स व इतर ऐवज, रोख रक्कम असे विविध गुन्हे पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या संदर्भात पोलीस उप आयुक्त परी 2 पनवेल शिवराज पाटील, सहाय्यक आयुक्त नितीन भोसले-पाटील, पनवेल विभाग वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे व गुन्हे निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनिल तारमळे, हवालदार रवींद्र राऊत, नाईक परेश म्हात्रे, युवराज राऊत, शिपाई सुनिल गर्दनमारे, यादवराव घुले, विवेक पारासूर आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय बातमीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी समरान अब्बास पटेल (वय 24), शहाबाज अब्दुल रेहमान पटेल (23), मन्नन अजिज पटेल (21, रा. मन्ननकॉलनी, तळोजा) यांना तळोजा येथुन ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हे कबुल केल्यावर त्यांना अटक करण्यात आली. अटक आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल अशरफ अब्दुल मजीद शेख (वय 25, रा. हिंदुस्थान हॉटेंलचे मागे नावडे फाटा,तळोजा) याला विक्री केल्याचे सांगितल्याने अशरफ अब्दुल मजीद शेख यास अटक आहे. या प्रकरणी आरोपींकडून चोरीच्या मालासह रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली इको कार व रिक्षा असा मिळून जवळपास सात लाख 41 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे करीत आहेत.