पॅरिस ः वृत्तसंस्था
दीपिका कुमारीने सातत्यपूर्ण कामगिरी करीत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत एकाच दिवशी सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक नोंदवली.
दीपिकाने महिला एकेरीच्या रिकर्व्ह प्रकारातील अंतिम फेरीत रशियाच्या एलेना ओसिपोव्हा हिच्यावर 6-0 अशी हुकूमत गाजवली. तिने मिश्र आणि महिला सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. मिश्र प्रकाराच्या अंतिम फेरीत दीपिकाने आपला पती अतनू दास याच्या साथीने पिछाडीवरून मुसंडी मारत पहिला क्रमांक पटकावला. नेदरलँड्सच्या जेफ व्हॅन डेन बेर्ग आणि गॅब्रियला श्लोएशर यांच्याविरुद्ध 2-0 असे मागे पडल्यानंतरही जोमाने पुनरागमन करीत त्यांनी 5-3 असा विजय साकारला. याआधी दीपिका, अतनू यांनी याच स्पर्धेत पाच रौप्य, तीन कांस्यपदके मिळवली आहेत.
महिलांच्या रिकर्व्ह प्रकाराच्या अंतिम फेरीत दीपिकाने अंकिता भगत आणि कोमालिका बारी यांच्या साथीने मेक्सिकोवर 5-1 अशी मात करीत सुवर्णपदक पटकावले.
सलग तीन सुवर्णपदके मिळवल्याने मी खूप आनंदी आहे. महिला एकेरीत निर्विवाद वर्चस्व गाजवता आल्याने माझ्या कामगिरीवर मी समाधानी.
-दीपिका कुमारी