Breaking News

रायगडात हॉटेल, रिसॉर्ट 50 टक्के क्षमतेने होणार खुली

अलिबाग ः प्रतिनिधी
राज्यातील कोरोना प्रादुर्भाव अधिक असलेल्या सात जिल्ह्यांमध्ये रायगडचा समावेश आहे. त्यामुळे शासनाच्या अनेक निर्बंधांतून रायगडकरांची अद्याप तरी सुटका झालेली नाही. लेव्हल-4मध्ये असलेल्या रायगडमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने केवळ 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत, तर हॉटेल आणि रिसॉर्टला 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या व्हिडीओनंतर जिल्ह्यात लॉकडाऊनबाबतचा असलेला संभ्रम दूर झाला आहे.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या नियमांचे पालन करून हॉटेल, रिसॉर्ट सुरू करण्याची अधिसूचना 25 जून रोजी काढली आहे. त्यामुळे तीन महिन्यापासून बंद असलेले हॉटेल, रिसॉर्ट, लॉज आता पुन्हा पर्यटकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या आदेशामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे, मात्र ही हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच खुली ठेवता येणार आहेत.
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार लेव्हल-5मधील नागरिकांना ई-पासशिवाय येण्यास बंदी आहे. हॉटेलमध्ये येणार्‍या अभ्यंगताना अंतर्गत खेळ, स्विमिंग पुलावर जाण्यास बंदी आहे, तर मोकळ्या जागेत व्यायाम, सायकलिंग करण्यास परवानगी आहे. पर्यटकांनी आणि हॉटेल व्यवसायिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, मात्र कोरोनाचे रुग्ण अधिक असलेल्या किंवा कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या भागातील हॉटेल रिसॉर्ट सुरू ठेवता येणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यात शनिवार-रविवारी वीकेण्ड लॉकडाऊन सुरूच राहणार आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply