माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील विळे भागाड एमआयडीसीमधील पोस्को कंपनीतील भंगाराच्या मलिद्यासाठी बाहेरील पुढार्यांनी स्थानिकांच्या विरोधात गुंडगिरी चालू केली आहे, ती त्वरित थांबवून भूमिपुत्रांना न्याय द्यावा, अशी मागणी विळे भागाड ग्रामस्थांनी रायगडच्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.तीस वर्षांपूर्वी माणगाव तालुक्यांतील विळे भागाड येथील जमीन कवडीमोल भावात संपादित करुन तेथे औद्योगीक वसाहत निर्माण करण्यात आली आहे. भविष्यात आपल्याला रोजगार उपलब्ध होईल, छोटे-मोठे उद्योगधंदे करता येतील, आजी बाजूच्या परिसराचा विकास होईल, नोकरी, व्यवसायासाठी पुढल्या पिढीला मुंबई, पुण्यात जावे लागणार नाही या आशेने स्थानिकांनी आपल्या जमिनी दिल्या. त्यामुळेच पोस्कोसारख्या मोठ्या कंपन्या येथे येऊ शकल्या. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी बाहेरील गावगुंडांना हाताशी घेत भूमिपूत्रांचा हक्क काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पोस्को कंपनीतील भंगाराच्या मलिद्यासाठी गुंडाकडून स्थानिकांच्या गाड्या फोडल्या जात आहेत. वाहतूकदारांवर दमदाटी करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याबाबत माणगाव आणि कोलाड पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रारी करूनदेखील कारवाई होत नसल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या सर्व गोष्टींना स्थानिक खासदारांचे पुत्र आणि महाडच्या आमदारांचे पुत्र हेच जबाबदार आहेत. सत्ता आणि प्रशासनाचा गैरवापर करून दहशत पसरविण्याच्या या सर्व गोष्टी लवकरात लवकर थांबल्या नाही तर 12 जुलै सकाळी 11 वाजल्यापासून विळे सरपंच आण्णा कोदे, भागाड सरपंच प्रकाश जंगम, ज्ञानेश्वर उतेकर, संतोष पोळेकर यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.