कर्जत : बातमीदार
कोरोनाचा प्रादुर्भाव माथेरानमध्येसुद्धा जाणवला. मात्र तुटपुंजी आरोग्य व्यवस्था असताना येथील डॉक्टरांनी धीराने कोरोनाशी दोन हात करून रुग्णांना कोविड मुक्त केले. शासनाचे डॉ. प्रशांत यादव, डॉ. प्रांजल सिंग, नगर परिषदेचे डॉ. उदय तांबे या तिन्ही डॉक्टरांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. माथेरानच्या बी. जे. हॉस्पिटलमध्ये फक्त प्रथमोपचार केले जायचे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला त्यावेळी या डॉक्टरांनी नगर परिषदेकडे ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याची मागणी केली. नगर परिषदेने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ऑक्सिजन बेडसाठी मदत करताच माथेरानच्या या हॉस्पिटलमध्ये 12 ऑक्सिजन बेड आणि एक अत्यावश्यक ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले. कोणत्याही वेळेत कोरोना रुग्ण दाखल होत होते.पण न थकता, हसतमुखाने हे तिनही डॉक्टर रुग्णांवर उपचार करत राहिले. हॉस्पिटलमधील व्यवस्था तुटपुंजी होती हे ज्ञात असतानाही या डॉक्टरांनी रुग्णांना धीर देत त्यांच्यावर योग्य उपचार केले. मार्च महिन्यापासून त्यांनी घर कधी पाहिले नाही. माथेरानमधील नागरिकांनी या डॉक्टरांच्या कामावर समाधान व्यक्त केले, तर काही बर्या झालेल्या रुग्णांनी देवदूताची उपमा देत डॉक्टरांचे आभार मानले.
कोरोना काळात रुग्णसंख्या वाढत असताना आम्ही हिमतीने प्रामाणिक काम केले. चार महिन्यात 205 कोरोना रुग्ण होते. त्यांच्यावर योग्य उपचार करत त्या सर्वांना कोरोनामुक्त केले. येथे एकही रुग्ण दगवलेला नाही त्यामुळे आम्ही माथेरानचा मृत्युदर 0 ठेवण्यात यशस्वी झालो.
-प्रशांत यादव, वैद्यकिय अधिकारी, माथेरान.
सध्या माथेरानमध्ये फक्त 10 रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणं असून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसात माथेरान कोरोनामुक्त होईल. आतापर्यंत दोन हजार लोकांना लस देऊन झाली आहे.
-उदय तांबे, वैद्यकीय अधिकारी, माथेरान