Breaking News

अर्जेंटिना उपांत्य फेरीत

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा

रियो दी जानेरो ः वृत्तसंस्था
लिओनेल मेसीच्या 76व्या आंतरराष्ट्रीय गोलमुळे अर्जेंटिनाने इक्वेडोरवर 3-0 अशी मात करीत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यशस्वी खेळात सातत्य राखत मंगळवारी उपांत्य फेरीत अर्जेंटिनाला कोलंबियाचा सामना करायचा आहे. मेसीने या लढतीत तिसर्‍या क्रमांकाचा गोल केला, पण आधीच्या दोन गोलमध्येही त्याचे महत्त्वपूर्ण सहाय्य होते.
  मेसीला आता विक्रमही खुणावत आहे. दक्षिण अमेरिकेतून सर्वाधिक गोल करणार्‍यांच्या यादीत पेले यांच्यासह संयुक्त अव्वल होण्याची संधी मेसीला आहे. पेले यांच्या गोलशी बरोबरी करण्यासाठी मेसी एका गोलने मागे आहे. या विजयासह मेसीने आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनेही आणखी एक पाऊल टाकले आहे. आपल्या अर्जेंटिना संघासाठी त्याला मानाची ट्रॉफी जिंकायची आहे अन् या विजयामुळे त्याचे हे स्वप्न जिवंत आहे.
गोइनिया येथील ऑलिम्पिको स्टेडियममध्ये पार पडलेल्या लढतीत रॉड्रिगो डी पॉलने 39व्या मिनिटाला पहिला गोल केला, तर लॉटारो मार्टिनेजने 84व्या मिनिटाला दुसरा गोल तडकावला. अलीकडेच बार्सिलोनासह मेसीचा करार संपुष्टात आला आहे. मेसीने या दोन्ही गोलमध्ये सहाय्यक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. मेसीने लढतीच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये फ्री किकवर अर्जेंटिनाचा तिसरा गोल केला.
हा मेसीचा यंदाच्या कोपा स्पर्धेतील एकूण चौथा गोल ठरला आहे. अर्जेंटिनाला आणखी मोठ्या फरकाने लढत जिंकता आली असती, पण त्यांनी गोल करण्याच्या संधी गमावल्या. कोलंबियाविरुद्धच्या लढतीत त्यांना या चुका प्रकर्षाने टाळाव्या लागणार आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply