Breaking News

जनतेचा आक्रोश समजून घ्या!; भास्कर जाधवांच्या वर्तनावर फडणवीसांनी सुनावले

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. मदतीसाठी आक्रोश करणार्‍या एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच दमदाटी केल्यामुळे राज्यभरातून भास्कर जाधव यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकटकाळात जनतेचा आक्रोश समजून घ्यावा, असे म्हणत भास्कर जाधव यांच्या या कृतीवर संतप्त प्रतिक्रिया दिली. फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, भास्कर जाधव यांनी आत्मचिंतन करावे. अशा संकटकाळात आपण जनतेचा आक्रोश समजून घ्यायला हवा. जाधव यांचे हे वर्तन आपल्याला अजिबात योग्य वाटत नाही. या वर्तनाची पक्षाने, तसेच मुख्यमंत्र्यांनी दखल घेणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. भास्कर जाधव यांच्यावर कारवाई होणार की नाही हा पक्षांतर्गत प्रश्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. रविवारी चिपळूणच्या पाहणी दौर्‍यावर असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापार्‍यांचे झालेले नुकसान आणि गार्‍हाणी ऐकत होते. त्यावेळी स्वाती भोजने या त्यांच्या दुकानासमोर उभ्या होत्या. मुख्यमंत्री पाहणी करताना स्वाती यांच्या दुकानासमोर आले, तेव्हा स्वाती यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. माझे घर गेले माझे दुकान गेले तुम्ही काहीतरी करा, असे म्हणत स्वाती यांनी आपली तक्रार मांडण्यास सुरुवात केली. तुम्ही काय पण करा तुम्ही आमदार-खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी फिरवा. तुम्ही काय पण करा पण मदत करा… असे अगदी रडत रडत स्वाती यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी मान हलवत होकार देत, वळवतो वळवतो… असे म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत असलेले स्थानिक आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अगदी दमदाटीच्या स्वरामध्ये स्वाती यांच्या मुलाला आईला समजावण्यास सांगितले. आमदार, खासदारांचा दोन महिन्यांचा पगार देण्याच्या मागणीवर भाष्य करताना जाधव यांनी, हे बघा आमदार, खासदार पाच महिन्यांचा पगार देतील, पण त्याने काय होणार नाही, असे स्वाती यांना सांगितले. त्यावर फूल ना फुलाची पाकळी समजून आम्हाला मदत करा, अशी मागणी स्वाती यांनी केली, मात्र भास्कर जाधव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चला म्हणत मुख्यमंत्र्यांसोबतच्या ताफ्यातील लोकांना पुढे जाण्याचा इशारा केला. त्यानंतर मागे वळून पाहत, बाकी काय? तुमचा मुलगा कुठाय, असे भास्कर जाधव यांनी हातवारे करून विचारले. त्यानंतर स्वाती यांचा मुलगा दिसताच, आईला समजाव, आईला समजाव, उद्या भेट, असे भास्कर जाधव म्हणाले. या भेटीचे आमंत्रणही त्यांनी दमदाटीच्या स्वरातच दिल्याचे पाहायला मिळाले. भास्कर जाधव यांच्या या वर्तनावरून त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, जाधव यांनी या विषयावर मला काहीच बोलायचं नाही, असे म्हणत बोलणे टाळले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply