Breaking News

‘मुंबईकरांना मदत करण्यास विसरू नका’

मुंबई : प्रतिनिधी

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत करताना मुंबईतील नुकसानग्रस्तांना मदत करण्यास विसरू नका. तसे झाले तर मुंबई भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांना आणि महाविकास आघाडीला दिला. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना विनानिकष मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, त्यावरून आमदार भातखळकर यांनी राज्य सरकारकडे मुंबईकरांनाही मदत करण्याची मागणी केली आहे. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झोपडपट्टी, चाळीत राहणारे नागरिक, छोटे दुकानदार, मध्यमवर्गीय यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. चेंबूर, मुलुंड या ठिकाणी दरड कोसळून 40 पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले. हनुमाननगर, पोयसर, दिंडोशी, गोवंडी, निबारपाडा, विक्रोळी या परिसरात शेकडो घरे जमीनदोस्त झाली, हजारो घरांमध्ये पाणी जाऊन घरगुती साहित्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठाकूर कॉम्प्लेक्ससह अनेक ठिकाणी पाणी साचून हजारो ऑटोरिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Check Also

युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्मेट वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश …

Leave a Reply