नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे दिलासादायक वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे. असे असले तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे गरजेचे आहे. नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांत घट झाली असून गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या स्थिर असल्याने बाधितांचा दरही कमी झाला आहे. कोरोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतरही गेली आठ दिवस शहरातील कोरोना रुग्णसंख्या 50 ते 60च्या घरात स्थिर राहिल्याने कोरोनाबाधित दरही आता 0.99 इतका कमी झाला आहे, तर उपचाराधीन रुग्णसंख्याही एक हजारांपेक्षा कमी झाली आहे. हा शहरासाठी मोठा दिलासा आहे, मात्र रेल्वे प्रवास सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या वाढण्याचा धोका कायम असल्याने प्रशासन सतर्क आहे. कोरोनाची पहिली व दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रशासनाने शहरातील कोरोना काळजी केंद्र बंद करून वाशी येथील एकमेव सिडको प्रदर्शन केंद्रात कोरोना उपचारासाठी सुरू ठेवले आहेत. मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या 100च्या आत असली, तरी कधीही रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता पालिकेने वर्तवली आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या मात्र कमी केली नाही. गेल्या सहा दिवसांपासून दैनंदिन रुग्णांची संख्या ही 50 ते 70च्या घरात कायम आहे. दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर असून बरे होणारे रुग्ण त्यापेक्षा अधिक असल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी होत आहे. सध्या एक हजारापेक्षा कमी उपचाराधीन रुग्ण आहेत. शहरातील कोरोनाबाधित दर हा जुलैमध्ये महिनाभरापूर्वी 1.49 वर होता तो आता 0.99 पर्यंत खाली आली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात असली, तरी तिसर्या लाटेची शक्यता पाहता पालिका प्रशासनाने आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवली आहे. शहरातील 6900 खाटांची व्यवस्था वाढवून ती 12 हजार खाटांची व्यवस्था होत आहे. पहिल्या लाटेत एका दिवसातील सर्वोच्च रुग्णसंख्या 20 ऑगस्टला 477 होती. दुसर्या लाटेत ही संख्या 4 एप्रिलला 1441 पर्यंत गेली होती. त्यामुळे खाटांची संख्या वाढविण्यात येत आहे.
लसीकरण वेगात
कोरोना लसीकरणही वेगात सुरू असून लसींच्या उपलब्धतेनुसार नवी मुंबईत लसीकरण होत आहे. बुधवारी महापालिकेच्या चार रुग्णालयांत कोविशिल्ड लसीची दुसरी मात्रा, तर 18 वर्षांवरील नागरिकांना वाशी, नेरूळ, ऐरोली या तीन रुग्णालयांत कोवॅक्सिनची दुसरी मात्रा देण्यात आली.