Breaking News

नवीन पनवेलसाठी तीन जलकुंभ

नागरिकांना होणार मुबलक पाणीपुरवठा

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेलच्या पाणीप्रश्नाबाबत पनवेल महापालिकेतील भाजपचे नगरसेवक संतोष शेट्टी यांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्या अनुषंगाने लवकरच नवीन पनवेलमध्ये तीन जलकुंभ उभारले जाणार असून, मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.

सिडकोने वसविलेल्या नवीन पनवेलमध्ये लोकसंख्या वाढत आहे. नागरीकरणामुळे पिण्याच्या पाण्याची वाढती गरज पाहता नवीन पनवेलच्या प्रश्नांबाबत नगरसेवक संतोष शेट्टी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे, तसेच आमरण उपोषणही केले होते. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी व्यवस्था सुधारण्याची आणि अधिक पाण्याचा साठा करण्यासाठी जलकुंभ बांधण्याची मागणी त्यांनी केली होती.

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सिडको अधिकार्‍यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत जलकुंभाच्या उभारणीसाठी आमदार ठाकूर यांनी हिरवा कंदील दिला. त्यानुसार नवीन पनवेल पूर्व सेक्टर क्रमांक 3, 12 व 15 येथे प्रशासकीय मान्यता मिळाली असून, या कामाची ई-निविदा प्रक्रिया चालू झाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच जलकुंभ बांधण्याचे काम सुरू होणार आहे.

याचबरोबर नवीन पनवेल पश्चिमेस सेक्टर क्रमांक 12 येथील जलकुंभाची दुरुस्ती कामालासुद्धा प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच ई-निविदा प्रसिद्ध होऊन कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Check Also

आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच …

Leave a Reply