Breaking News

विकासकामांच्या जोरावर बारणे बाजी मारणार

उरणचे आमदार मनोहर भोईर यांचा दावा

उरण : नितीन देशमुख

मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना खासदार श्रीरंग बारणे यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. या विकासकामांच्या जोरावर ते पुन्हा एकदा बाजी मारतील, असा दावा उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी केला. ते ‘रामप्रहर’च्या खास मुलाखतीत बोलत होते.

शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विकासकामांबद्दल सविस्तर माहिती देताना आमदार भोईर यांनी सांगितले की, बारणे साहेबांनी पळस्पे ते जेएनपीटीपर्यंत आठ फुटी रस्ता मंजूर करून पूर्ण करीत आणला आहे. त्यासाठी तीन हजार कोटींचा निधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या सहकार्याने मंजूर करून घेतला. त्याच्या बाजूने सर्व्हिस रोड बांधण्यात येत आहे. जागतिक हेरिटेजमध्ये समावेश असलेल्या घारापुरीला  70 वर्षे वीज नव्हती. या बेटावर केंद्र सरकारच्या माध्यमातून वीज आणली. त्यासाठी समुद्रातून वीजवाहिनी टाकण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना ससून डॉकला जावे लागायचे. त्यांना खूप त्रास व्हायचा. तो टाळण्यासाठी 162 कोटीचे करंजा येथे मार्केट बांधण्याचा प्रकल्प सरकारच्या वतीने पूर्ण होत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळही साकारत आहे. रायगडमध्ये सेफ्टी झोन उठवण्यासाठी माजी संरक्षण मंत्री (कै.) मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन तो प्रश्न मार्गी लावला. घाटमाथ्यावर मावळमध्ये रेड झोन आहे तो उठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पनवेलमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. उरण रेल्वेमार्गासाठी सतत पाठपुरावा केल्याने तो मार्ग पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात आहे. त्यामुळे उरणकरांचे मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे. याशिवाय अनेक छोटे-मोठे प्रश्न, गावातील ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, गटारे, रस्ते आणि पाण्यासाठी खासदार निधीतून श्रीरंग बारणे यांनी कामे केली आहेत.

विमानतळाच्या जागेबाबत स्थलांतरितांच्या प्रश्नांवर आमदार भोईर यांनी सांगितले की, मी 2014मध्ये आमदार झालो तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या पॅकेजमध्ये अनेक बदल करून घेतले. आता विशेष वाद नाहीत. बहुतेक प्रश्न सुटले आहेत. काही राहिले असतील, तर आम्ही ते सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत.

भाजप व अन्य मित्रपक्षांचे सहकार्य कसे आहे याबाबत सांगताना आमदार भोईर म्हणाले की,  खासदार श्रीरंग बारणे प्रथम पनवेलमध्ये बैठकीला आले त्या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उदात्तपणे आम्ही सेनेच्या चार पाऊले पुढे असू, असे सांगितले होते. रामशेठ ठाकूर हे शब्दाला जागणारे आहेत. त्याचप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, रिपाइंचे जगदीश गायकवाड आणि भाजप, रिपाइंचे कार्यकर्ते काम करीत आहेत. खासदार बारणेंना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत या भावनेने सगळे काम करीत आहेत. त्यामुळे आम्ही या भागातून मोठी आघाडी घेऊ.

यंदा मोठ्या प्रमाणात नवतरुण मतदारांची नोंदणी झाली आहे. हा तरुण शिवसेना-भाजपलाच  मतदान करेल, कारण आपला देश स्वावलंबी, बलवान आणि मजबूत असावा असे प्रत्येकाला वाटते. आपल्या देशाला सीमेवर धोका होऊ नये यासाठी  योग्य निर्णय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच घेऊ शकतात याची त्यांना खात्री झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव तरुणाईला झाली आहे. मोदींसारखा इतर देशांना टक्कर देणारा विरोधकांकडे दुसरा नेता  नाही. त्यामुळे हा सुशिक्षित तरुण भविष्याचा विचार करून आपल्याला रोजगार उपलब्ध करून देऊ शकणार्‍या, देशाला प्रगतिपथावर नेऊ शकणार्‍या नरेंद्र मोदींसाठी मतदान करेल याची खात्री आहे असे सांगून आमदार भोईर म्हणाले की, तरुणांना व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जेएनपीटीच्या माध्यमातून दीड लाख नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. आज नवीन येणाया उद्योगांत कुशल कामगारांची गरज असल्याने त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही उरणमध्ये तंत्रशिक्षणाची सोय उपलब्ध करीत आहोत. त्यासाठी जागा घेतली आहे. लवकरच ते सुरू होईल. येथील तरुणांना प्रशिक्षणासाठी नवी मुंबई किंवा अन्यत्र जायला लागू नये हे आमचे स्वप्न आहे. ते लवकरच पूर्ण होईल. 

पक्षीय बलाबलानुसार असलेल्या सद्यस्थितीबाबत प्रकाश टाकताना आमदार भोईर म्हणाले की, 2014च्या लोकसभेला लक्ष्मण जगताप यांना येथून 22 हजार 500 मतांची आघाडी मिळाली होती. सहा महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत सगळे पक्ष स्वतंत्र लढले. त्या वेळी ही आघाडी 25 हजारांनी कमी झाली आणि शिवसेनेकडून आमदार म्हणून मी निवडून आलो. आज प्रत्येक ठिकाणी इनकमिंग सुरू आहे ते भाजप आणि शिवसेनेत. त्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघात आम्ही 30 हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी घेऊ. त्या वेळी पनवेलमध्ये  रामशेठ ठाकूर आमच्याबरोबर नव्हते. आज त्यांची 75 हजारांपेक्षा जास्त मते आणि कर्जतमधील 30 हजार मते अशी एकूण दीड लाख मतांची आघाडी आम्ही निश्चित देऊ. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसची घाटमाथ्याखाली मते नाहीत. शेकापच्या जीवावर ते निवडणूक लढत आहेत. आज या तीन मतदारसंघांत सात लाख मतदान झाले, तर त्यापैकी पाच लाखांपेक्षा जास्त मतदान आम्हाला होईल. ग्रामीण भागात शेकापची अवस्था बिकट झाली आहे. माजी आमदार विवेक पाटील यांच्या कर्नाळा मतदारसंघासह इतर ठिकाणच्या ग्रामपंचायत  निवडणुकीत आम्ही मोठ्या प्रमाणात विजय मिळवून त्यांची मक्तेदारी मोडीत काढली आहे, याकडेही आमदार भोईर यांनी लक्ष वेधले. 

अजित पवार म्हणतात पार्थ तरुण, अविवाहित आणि पदवीधर उमेदवार आहे. म्हणून त्याला निवडून द्या याचा आमदार भोईर यांनी समाचार घेतला. लोकसभेत अविवाहित आणि विवाहित खासदार जाणे हा महत्त्वाचा प्रश्न नाही. तिथे कोणी लग्न जमवण्यासाठी जात नाहीत, तर लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी जातात. अजितदादांनी तरी असे विधान करणे चुकीचे आहे, असे भोईर म्हणाले. त्यांच्याकडे आपल्या मुलासाठी मत मागताना सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते लोकांची दिशाभूल करीत आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. अजितदादांनी सांगितले की, पार्थ तरुण आणि पदवीधर आहे, तर खासदार दहावी शिकलेले आहेत. इथे शिक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा नसून समाजाचे प्रश्न समजून ते सोडवण्यासाठी काय करता येईल याची जाणीव असावी लागते. ती बारणे साहेबांना आहे. म्हणूनच ते पाच वेळा नगरसेवक व नंतर खासदार झाले. त्यांनी सभागृहात 1100 प्रश्न विचारले. त्यांना 289 वेळा बोलण्याची संधी मिळाली. ते सभागृहात करमणुकीसाठी बोलत नाहीत. संसदेच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडली जाते. खासदार बारणेंमुळे अनेक प्रश्न सुटले आहेत. म्हणूनच त्यांना पाच वेळा संसदरत्न पुरस्कार त्यांना मिळाला. त्यासाठी शिक्षणापेक्षा लोकांची कामे करण्याची तळमळ असणे गरजेचे असते. शिक्षणाचे बोलाल, तर वसंतदादा  चौथी शिकलेले होते, पण त्यांनी महाराष्ट्राचे  मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात कृषी मंत्रीपद यशस्वीपणे सांभाळलेले आपण पाहिले आहे. 

आमदार भोईर यांनी पुढे सांगितले की, आम्ही महायुतीचे प्रमुख पदाधिकारी एकत्र येऊन गावागावात जाऊन मतदारांना या सरकारने काय केले याची माहिती देत आहोत. त्यासाठी पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती असणारे पत्रक घरोघरी त्यांना वाचण्यासाठी देऊन केलेल्या कामाची माहिती देत आहोत. आम्हाला यावेळी असा अनुभव येतो की आमचे कार्यकर्ते गावात पोहोचतात त्या वेळी मतदारच आमची वाट पाहात असतात. ते शेकडोंच्या संख्येने आमच्या प्रचार फेरीत सहभागी होतात. त्यामुळे आमच्या प्रचार फेरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मावळ मतदारसंघात पनवेलमध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा 20 एप्रिलनंतर; तर चिंचवड भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा निश्चित करण्यात येत आहे, असे आमदार मनोहर भोईर यांनी शेवटी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply