Breaking News

शिघ्रे ग्रामपंचायत डम्पिंग ग्राऊंडच्या प्रतीक्षेत

घंटागाडी बंद असल्याने वेशीवर कचर्‍याचे साम्राज्य!

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यांतील शिघ्रे ग्रामपंचायतीने घंटागाडी बंद केली असल्याने ग्रामस्थ गेल्या आठ महिन्यांपासून गावाच्या वेशीवरील गटारात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकत आहेत. प्रशासनाने ग्रामपंचायतीला तातडीने डम्पिंग ग्राऊंडची जागा निश्चित करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

 पूर्वी शिघ्रे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात येत असे. मात्र ग्रामस्थांना त्याचा त्रास होऊ लागल्याने ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 157 व 154  मध्ये कचर्‍याची विल्हेवाट लावली जात आहे. सदरची जागा मुख्य रस्त्यालगत आहे.  शिघ्रे ग्रामपंचायतीची एक घंटागाडी असून, तीच्याद्वारे ग्रामपंचायत हद्दीतील शिघ्रे, वाणदे, नागशेत, नवीवाडी व आदिवासीवाडी येथील रोज सुमारे एक टन कचरा गोळा केला जात असे. मात्र डम्पिंग ग्राऊंड नसल्याने घंटागाडी बंद करण्यात आली आहे.

शिघ्रे ग्रामपंचायतीच्या स्वागत कमानीसमोर शौचालय युनिट आहे. मात्र दोन गावांच्या भानगडीत या शौचालयाची जागा बदलली जात नाही आणि दुरुस्तीही होत नाही. या शौचालयासमोरच्या गटारात ग्रामस्थ राजरोस कचरा टाकत आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा घरे व दुकानेही आहेत. त्यांना या कचर्‍याचा त्रास होत आहे.

शिघ्रे ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राऊंडसंदर्भातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या आदेशानुसार मुरूड तहसील व वन विभागाच्या अधिकार्‍यांनी संयुक्तरित्या तातडीने नागशेत हद्दीत स्थळ पहाणी करावी आणि डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा निश्चित करून ती ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करावी, अशी विनंती शिघ्रे ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 37,33 व 43 ही जागा सरकारी मालकीची आहे. सदर जागा ग्रामपंचायतीला डम्पिंग ग्राऊंडकरीता उपलब्ध करून द्यावी, यासाठी जिल्हाधिकारी व अलिबाग उपविभागीय अधिकारी तसेच मुरूड गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू आहे.

-संतोष पाटील, सरपंच, ग्रामपंचायत शिघ्रे, ता. मुरूड

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply