Breaking News

बेळगाव महापालिकेवर कमळ फुलले!; भाजपची एकहाती सत्ता

बेळगाव ः वृत्तसंस्था

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता काबिज करीत कमळ फुलवले आहे. या निवडणुकीत भाजपने एकूण 58 पैकी 36 जागा जिंकल्या. भाजपला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देत सत्ता सोपवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी 3 सप्टेंबर रोजी मतदान झाले होते, तर सोमवारी (दि. 6) मतमोजणी झाली. एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी सर्वाधिक 36 जागी भाजपने बाजी मारली. काँग्रेसचे नऊ, अपक्ष आठ, महाराष्ट्र एकीकरण समिती चार आणि एमआयएमचा एक उमेदवार विजयी झाला आहे. 58 जागेवर निवडणूक असली, तरी बेळगाव महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी खासदार आणि आमदारांना मतदानाचा अधिकार आहे. सध्या बेळगावमध्ये भाजपचे दोन खासदार आणि दोन आमदार आहेत, तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. सत्ता प्राप्त करण्यासाठी 33 या जादुई आकड्याची (मॅजिक फिगर) गरज असते. आणि भाजपने 36 जागा जिंकत निर्विवादपणे सत्ता प्राप्त केली आहे. केंद्र आणि राज्यात भाजपने केलेल्या कामाची पोचपावती बेळगाववासीयांनी दिल्याची प्रतिक्रिया या निकालानंतर आमदार अभय पाटील यांनी दिली. महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये या वेळी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने केवळ 21 जागांवर समितीला आपले अधिकृत उमेदवार देता आले. त्याचा फटका त्यांना बसला, तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीतील अनेक इच्छुकांना भाजपने उमेदवारी दिली होती. विशेषतः बेळगाव दक्षिण या मराठाबहुल भागात भाजपने खेळलेले मराठा कार्ड यशस्वी झाल्याचे निकालाअंती दिसून आले आहे.

निकालानंतर पक्षीय बलाबल

भाजप     : 36

काँग्रेस     : 9

अपक्ष      : 8

महाराष्ट्र एकीकरण समिती : 4

एमआयएम : 1 एकूण जागा : 58

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply