एखाद्या न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कुठल्या थराला जाऊ शकते याचे ताजे उदाहरण म्हणून कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाकडे बोट दाखवावे लागेल. विमानतळ उभारणी आणि त्याचे चलनवलन हा संपूर्णत: केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीतील विषय असतो. त्याचा राज्याशी संबंध येतोच कुठे?
कोकणातील निसर्गरम्य किनारपट्टी भागात चिपी येथे टुमदार विमानतळ केव्हाच उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर उडान योजनेंतर्गत देशभरातील छोटी-मोठी स्थळे हवाईमार्गे जोडून आधुनिक दळणवळणाचे एक जाळे उभे करण्याचे ठरवले होते. त्यानुसार चिपी येथील विमानतळ यथावकाश उभे राहिले. 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेथील सुबक अशा टर्मिनल इमारतीचे उद्घाटनदेखील पार पडले होते तसेच फाल्कन 2000 जातीच्या विमानांचा उपयोग करून तेथील धावपट्टीच्या चाचण्यादेखील शिस्तीत पार पडल्या होत्या. एखादे विमानतळ राज्यामध्ये कार्यरत असले तरी त्याच्यावर राज्य सरकारने मालकी हक्क गाजवणे हास्यास्पद आहे. तरीही महाराष्ट्राचे मंत्री विमानतळाचे आम्ही यजमान आणि मालक आहोत अशी दर्पोक्ती करतात हे अनाकलनीय वाटते. येत्या 9 ऑक्टोबर रोजी नागरी हवाई वाहतूकमंत्री जोतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे रीतसर उद्घाटन होईल. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे व श्री. शिंदे दिल्लीहून मुंबईला जातील व तिथून ते चिपी विमानतळावर पोहचतील असे सांगण्यात आले आहे, परंतु विमानतळाचे श्रेय लाटण्यासाठी राज्यातील सत्ताधार्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन दिवस आधीच उद्घाटन उरकून घेण्याचा घाट घातला होता असे दिसते. या विमानतळावरून 7 ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू होईल असे ट्वीट शिवसेनेचे सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केल्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. हा सर्वच प्रकार निंदनीय म्हणावा लागेल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने हा खालच्या पातळीवरील राजकीय खेळ केला असे दुर्दैवाने म्हणावे लागते. चिपी विमानतळासाठी राणे यांनी पहिल्यापासूनच प्रचंड मेहनत घेतली आहे. या विमानतळाच्या उभारणीमध्ये त्यांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. केवळ त्यांना श्रेय मिळू नये म्हणून शिवसेनेतर्फे श्रेयवादाचा खेळ केला जात असेल तर ते महाराष्ट्रासाठीही दुर्दैवाचे आहे. असल्या राजकारणामुळे कोकणवासीय आपल्याला समर्थन देतील अशा भ्रमात शिवसेनेच्या नेत्यांनी राहू नये. चिपी विमानतळामुळे कोकण किनारपट्टीची भरभराट होणार असून आसपासच्या परिसरातील पर्यटनस्थळांना व व्यवसायांना चांगलीच बरकत येईल हे उघड आहे. हे सारे नारायण राणे यांच्यामुळेच झाले ही भावना कोकणवासीयांच्या मनात मूळ धरू नये म्हणून शिवसेनेच्या नेत्यांची ही श्रेयवादाची कागदी विमाने वर वर उडू लागली आहेतम, मात्र कोकणची जनताच ही विमाने जमिनीवर आणेल हे त्यांनी वेळीच ओळखावे. विमानतळाचे उद्घाटन हा श्रेयवादाच्या राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. केंद्र व राज्य सरकारने समन्वयानेच काम करायचे असते. येथे श्रेयवादाचा प्रश्नच उद्भवत नाही अशी परिपक्व प्रतिक्रिया राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ही प्रतिक्रिया कोकणच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या भावनेशी सुसंगत आहे.