अलिबाग : प्रतिनिधी
सहा महिन्याचे थकीत मानधन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी रायगड जिल्हा परिषद (राजिप) अंतर्गत येणार्या आरोग्य खात्यात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या वाहनचालक आणि सफाई कामगारांनी बुधवारी (दि. 15) अलिबागेतील जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली.
कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या कर्मचार्यांना आपण आज ना उद्या कायमस्वरूपी सेवेत रूजू होऊ अशी आशा असते, पण काही कर्मचारी वर्षानुवर्षे केवळ कंत्राटी कामगार म्हणूनच नोकरी करीत राहतात. अशीच काहीशी स्थिती रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात काम करणार्या 54 वाहनचालक आणि 48 सफाई कामगारांची झाली आहे. 15 ते 17 वर्षे केवळ कंत्राटी कामगार म्हणून यातील बरेच जण नोकरीत आहेत.
कोरोना काळात मुख्यालयी राहून 24 तास सेवा केली, मात्र त्यांना मानधन वेळेत मिळाले नाही. मार्च ते ऑगस्ट असे सहा महिन्यांचे आणि तत्कालीन आरोग्य अधिकारी देसाई यांच्या तोंडी आदेशाने 2018 मध्ये केलेल्या दोन महिन्यांच्या सेवेचेदेखील मानधन अद्याप त्यांना मिळालेले नाही. मानधन वेळेत मिळत नसल्याने उदरनिर्वाह चालविणे कठीण होऊन बसले आहे, असे या कंत्राटी कर्मचार्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या आरोग्य विभागाच्या वाहनचालक आणि सफाई कामगारांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन थकीत मानधनाची मागणी केली, परंतु मानधन आले नसल्याचे त्यांना सांगण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अमोल म्हात्रे यांनी दिली.