Breaking News

अंतर्गत विरोधामुळे निकालांपूर्वीच वाढल्या काँग्रेसच्या अडचणी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधील अंदाजांमुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि यूपीएची चिंता वाढली आहे, मात्र एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रत्यक्ष निकाल लागल्यास काँग्रेसची चिंता दोन पातळ्यांवर वाढणार आहे. एकीकडे केंद्रात सरकार न बनल्यास पक्षाचा संघर्ष अधिकच वाढणार आहे, तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये सुरू असलेली पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. जर ही गटबाजी रोखली गेली नाही, तर काही राज्यांत काठावरच्या बहुमतासह स्थापन केलेली सरकारे संकटात येऊ शकतात.

पंजाबमध्ये काँग्रेस बहुमतासह सत्तेवर आहे, मात्र मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात उघड वाद सुरू आहे. सिद्धू हे मला मुख्यमंत्रिपदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होऊ इच्छित आहे, असे अमरिंदर सिंह यांनी जाहीरपणे सांगितले होते.

अशीच परिस्थिती मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही आहे. या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्व नेत्यांनी दाखवलेले ऐक्य लोकसभा निवडणुकीदरम्यान दिसून आले नाही. राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांनी लोकसभा निवडणुकीत तितक्याशा उत्साहाने काम केले नाही. ज्यांना मुख्यमंत्रिपदासाठी योग्य मानले गेले त्यांच्यावरच पक्षाला निवडणूक जिंकून देण्याची जबाबदारी आहे, असा दावा त्यांच्याकडून करण्यात येत होता.

ज्योतिरादित्य शिंदे यांचा राज्यातील वावर कमी करण्यासाठी त्यांना पश्चिम उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली, तसेच भाजपचा बालेकिल्ला असलेल्या भोपाळ लोकसभा मतदारसंघात दिग्विजय सिंह यांना उभे करण्याची कल्पानाही कमलनाथ यांनीच दिली, असे सांगितले जात आहे. काँग्रेसने दणदणीत विजय मिळवलेल्या छत्तीसगडमध्येही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे 23 मे रोजी प्रत्यक्ष निकाल हाती आल्यानंतर काय परिस्थिती उद्भवेल याची चिंता काँग्रेस नेतृत्वाला सतावत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply