Breaking News

भ्रष्टाचाराची माळ

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री संशयाच्या घेर्‍यामध्ये अडकले आहेत. भ्रष्ट कारभाराच्या या माळेतील ताजे रत्न म्हणून शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव घ्यावे लागेल. निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना संपत्तीची लपवाछपवी केल्यासंबंधीच्या एका जुन्या खटल्यामध्ये न्यायालयाने त्यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय पंचवीस हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला आहे. कधी ना कधी हे घडणार याची कुजबुज राजकीय वर्तुळामध्ये पहिल्यापासून होतीच. गेल्या दोन वर्षांत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राचे जेवढे धिंडवडे काढले आहेत, तेवढे बहुदा संपूर्ण भारतात लोकशाहीच्या इतिहासात कुठल्याही राज्यात निघाले नसतील. मागल्या दाराने येऊन सत्तेच्या खुर्च्या काबीज करणार्‍या या सरकारने भ्रष्ट कारभाराचा कळस गाठला आहे असेच म्हणावे लागेल. या सरकारचा गृहमंत्री सध्या तुरुंगात गजाआड आहे. एका युवतीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी या सरकारमधील वनमंत्री खुर्ची सोडून घरी बसला आहे. याच सरकारातील परिवहन मंत्र्याचे बेकायदा रिसॉर्ट पाडून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि आता 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीचा अर्ज भरताना बच्चू कडू यांनी आपल्या मुंबईतील सदनिकेची माहिती हेतुपुरस्सर दडवली असे निष्पन्न झाले होते. त्यावर अमरावतीच्या चांदुरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. बच्चू कडू यांच्याकडे मुंबईत सुमारे 42 लाख 46 हजार रुपयांचा स्वत:च्या मालकीचा फ्लॅट होता. अंधेरी येथील राजयोग सोसायटीमध्ये 2011 सालीच हा फ्लॅट घेण्यात आला होता. तथापि 2014 सालच्या निवडणुकीत संपत्ती घोषित करताना कडू यांनी ही माहिती दडवून ठेवली. दरम्यान, भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी माहितीच्या अधिकाराच्या सहाय्याने कडू यांच्या सदनिकेबाबत संपूर्ण माहिती मिळवली होती. त्या आधारावर त्यांनी कडू यांच्याविरोधात 2017 साली पोलिसांत तक्रार गुदरली. त्या आधारे पोलिसांनी लोकप्रतिनिधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा पाच वर्षांनंतर निकाल लागला आहे. सदर सदनिकेसाठी आपण 40 लाखांचे कर्जदेखील काढले होते, परंतु कर्जाची फेड करता न आल्याने चार महिन्यांतच तो फ्लॅट विकावा लागला होता, असा युक्तिवाद बच्चू कडू यांच्यातर्फे न्यायालयात करण्यात आला. स्वत: कडू यांनी न्यायालयाचा निर्णय चुकीचा असला तरी त्याचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण अर्थातच उच्च न्यायालयात जाणार हे उघड आहे. तथापि यामुळे महाविकास आघाडी सरकारची जी काही उरली होती ती अब्रुदेखील धुळीला मिळाली आहे हेही तितकेच सत्य आहे. महिला, बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री असलेले बच्चू कडू हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. स्पष्टवक्तेपणा आणि सडेतोड स्वभाव यामुळे ते कायम चर्चेत राहिले आहेत, परंतु हे प्रकरण त्यांनाही जड जाणार हे वेगळे सांगायची गरज नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये संशयाच्या घेर्‍यात असलेल्या अर्धा डझन मंत्री आणि आमदारांमध्ये बच्चू कडू यांचे नाव कुणी घेत नव्हते, परंतु आता तेदेखील आले. या सरकारमध्ये सरळ वागणारा कुणी मंत्री आहे की नाही असा प्रश्न सामान्य माणसाला पडला तर आश्चर्य वाटायला नको. भ्रष्ट कारभाराची ही माळ कधी खंडित होणार याकडे आता महाराष्ट्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply