Breaking News

पाणीदार ग्रामपंचायत-जामरुंग

कर्जत तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन बनलेल्या जामरुंग ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील पाण्याच्ता स्त्रोतांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामपंचायत पाणीदार बनवली आहे. ग्रामपंचायतीमधील सर्व भागात पाणी साठवण करण्याचे यशस्वी नियोजन करून तसेच सिमेंट बंधारे आणि साठवण बंधारे यांची निर्मिती करून जलसाक्षरता मोहीम राबविण्याचे यशस्वी काम जामरुंगसारख्या नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीने केले आहे.

कर्जत तालुक्यातील टेंभरे या लोकसंख्या आणि आकारमानाच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या ग्रामपंचायतीचे 2018 मध्ये विभाजन करण्यात आले. त्यातून जामरुंग ही नवीन ग्रामपंचायत तयार झाली आणि प्रसिद्ध सोलनपाडा धरण, ऐतिहासिक पेठ किल्ला असलेले पेठ गाव, तसेच कामतपाडा, ठोंबरेवाडी आणि अन्य गावांची मिळून तयार झालेल्या जामरुंग ग्रामपंचायतीला अनुभवी सरपंच थेट जनतेतून मिळाले. तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय पिंपरकर यांनी जामरुंग या स्वतंत्र ग्रामपंचायतीची सूत्रे हातात घेतली आणि अनेक वर्षे विकासाच्या वाटेपासून दूर असलेल्या आपल्या भागातील गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा, असा प्रयत्न सुरू केला. उपसरपंच रोहिणी घुडे, ग्रामपंचायत सदस्य अरुण मेदगे, संदेश सावंत, शिवाजी बिबवे, अश्वीनी पिंपरकर, सुनिता मेदगे, वेदिका सावंत, छगन गावंडा, रेखा शेंडे, फसाबाई ठोंबरे तसेच प्रकाश चव्हाण, भगवान बांगर, पोलीस पाटील ज्योत्स्ना मेदगे यांचे सहकार्य गावाच्या विकासासाठी महत्वाचे ठरत आहे. या सर्व मंडळींनी राजकीय चपला बाजूला काढीत विकासापासून मागे राहिलेल्या भागांचा विकास साधता यावा यासाठी काम सुरू केले.

जामरुंग ग्रामपंचायतीच्या पहिल्या सदस्य मंडळाने  सर्वांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी नियोजन केले.सोलनपाडा येथील पाझर तलावातील पाण्याचा स्त्रोत वापरून कायमस्वरूपी नळपाणी योजनांना पाणी मिळेल याची व्यवस्था करून घेतली. गावागावात नळाला पाणी आल्याने ग्रामस्थांच्या चेहर्‍यावरील आनंद दिसू लागला.

मार्च महिना आला की पाझर तलावातील पाणी सोडण्यावर बंधने येत होती. त्यातून नळपाणी योजना कुचकामी ठरणार नाहीत, यासाठी पाझर तलावातील पाणी वाटपाचे नियोजन नक्की केले. रायगड जिल्हा परिषदेनेदेखील सरपंच पिंपरकर यांच्या पाझर तलावातील पाणीवाटपाला हो म्हणत पाण्याचे नियोजन ठरवून घेतले. घरोघरी पोहचणारे पाणी शुद्ध असावे, यासाठी ग्रामपंचायतीने जलकुंभांच्या खाली पाणी शुद्धीकरण संचदेखील बसवून घेतले आहेत.

सरपंच पिंपरकर यांनी आपली ग्रामपंचायत जलसाक्षर करण्यासाठी पुढचे पाऊल टाकले. त्यातून पाझर तलावातील पाणी ज्यामार्गाने चिल्हार नदीकडे जाते, त्या मार्गावरील सिमेंट बंधार्‍यांतून होणारी पाणी गळती थांबविण्याचे काम हाती घेतले. व हे बंधारे दुरुस्त केले.  डुक्करपाडा, ठोंबरेवाडी भागातील डोंगरामधून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी ग्रामपंचायतीने  चार ठिकाणी नवीन सिमेंट बंधारे आणि पाणी साठवण बंधारे बांधले आहेत.

रोजगराला पाणी…

ग्रामपंचायतीने या भागातील चिल्हार नदीत कोल्हापुरी पद्दतीचे बंधारे बांधले. त्यातील पाण्यावर येथील लोक रोपवाटिका यांची शेती करतात. हजारो रोपे तयार करण्याचे काम या भागातील शेतकरी करतात.  त्यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व भाग पाण्याचे दृष्टीने सुखी बनले आहेत.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply