Breaking News

भगव्याचे शिलेदार निवडून येतील : ना. रवींद्र चव्हाण

नेरळ : संतोष पेरणे

रायगड आणि मावळ हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला आहे आणि या लोकसभा निवडणुकीत येथील जनता अधिक भक्कमपणे युतीच्या पाठीशी उभा राहिलेली दिसेल, असा विश्वास रायगडचे पालकमंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. ते ‘रामप्रहर’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

ना. चव्हाण पुढे म्हणाले की, कोकणात पूर्वीपासून असलेली शिवसेना-भाजप युतीची विजयी पताका या वेळीही कायम राहील, याचे कारण मतदार हा भ्रष्टाचार करणार्‍यांना कधीही जवळ करीत नाहीत. कोकणातून 2014मध्ये निवडून गेलेल्या युतीच्या सर्व खासदारांनी चांगले काम केले आहे. आपल्यावर या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जबाबदारी दिलेल्या पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत सर्व मतदारसंघांतील खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत.

रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, कल्याण आणि भिवंडी या मतदारसंघांतील खासदारांनी आपण जनसेवक आहोत हे कामातून दाखवून दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्यासाठी प्रचार करण्यातदेखील आनंद वाटतो. आमचे खासदार हे जनतेसाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित करणारे आहेत. ते भ्रष्टाचार करणार्‍या उमेदवारांपेक्षा नक्कीच वेगळे व सरस आहेत. केंद्रीय मंत्री अनंत गीते तर सर्वांना आपले वाटतात.

मागील वेळेस आपण मावळ मतदारसंघात डौलाने भगवा फडकावला होता. या वेळेस आपल्यासमोर केवळ एक उमेदवार नव्हे; तर एक कुटुंब असून, त्या कुटुंबाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे, मात्र आपणही गाफील न राहाता आपली ताकद पणास लावली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार आपण घराघरांत पोहोचविले पाहिजेत असे सांगून ना. चव्हाण यांनी म्हटले की, माध्यमे पार्थ-पार्थ अशी चर्चा करीत असून, ते निवडणूक लढवत असलेला मतदारसंघ बारामती नाही. 2014प्रमाणे याही वेळी मनामनांत गेलेला विचार पुन्हा एकदा घुमेल आणि मावळमधील विजय हा आणखी मोठा असेल.

देशाची मान जगाच्या पाठीवर अभिमानाने उंचावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत एक रुपयाचे कर्ज घेतले नाही. त्यांनी जनसेवकाची भूमिका यशस्वीपणे बजावली आहे, मात्र मावळमध्ये आयात उमेदवाराचा राजकीय वारस ठरविण्यासाठी राष्ट्रवादी सर्वांना एकत्र करू पाहत आहे, पण शरद पवार यांचे राजकीय वारस यापूर्वीच जाहीर झाले असताना पार्थ नक्की कोणता वारसा सांगत आहेत, असा प्रश्न उपस्थित करीत ना. चव्हाण यांनी घराणेशाही काय असते हे राज्यातील जनतेने पार्थ यांच्या उमेदवारीने पाहिली आहे. ही लादलेली घराणेशाही मतदार स्वीकारणार नाहीत आणि त्यांना कोणाचे राजकीय वारस म्हणून मान्यदेखील करणार नाही, असा दावा केला. खरे तर राजकीय वारस ही शुद्ध धूळफेक मावळमधील मतदारांमध्ये निर्माण केली जात आहे. भ्रष्टाचार करणारे सत्तेत शिरकाव करू पाहत असून, त्यांना जागीच ठेचले पाहिजे, असेही पालकमंत्री म्हणालेे.

काँग्रेसवर टीका करताना ना. चव्हाण यांनी म्हटले की, देशाचे राजकारण काँग्रेस आघाडी दूषित करू पाहत आहेत. आपल्याला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ देश उभा करायचा आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात काश्मीरसाठी लावलेले 370 कलम हे फारूक अब्दुल्ला यांच्या दबावामुळे अधिक अधिकार देण्याचे जाहीर करीत आहेत, पण युतीकडे राज्यसभेत बहुमत कमी होते म्हणून ते कलम रद्द करता आले नाही, मात्र पुढील पाच वर्षे आपल्याला देश मजबूत करण्यासाठी 370 कलम रद्द करायचेच आहे आणि त्यासाठी मावळचा शिलेदार निवडून द्यायचा आहे. मोदी सरकारमुळे देशातील ग्रामपंचायतींमध्ये केंद्राचा निधी थेट पोहोचत आहे. त्याच वेळी शेतकरी, कामगार अशा सर्व वर्गांत आपल्या सरकारने दमदार कामगिरी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना तरुणांसोबतच्या संवाद सभेत पंतप्रधान मोदींना आय लव्ह यू म्हणावे लागले, यातूनच मोदींचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. मोदी सरकार देशातील जनतेकडे 12 मुद्द्यांवर मते मागत आहेत. काँग्रेसकडे कोणते मुद्दे आहेत ते त्यांनी सांगावे.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply