पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल पंचायत समितीत परीक्षांमध्ये गुणगौरव प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवारी (दि. 1) करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत उपस्थित होत्या. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे. त्या अंतर्गत दहावीत चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या प्रचिती नामदेव गायकर व अर्पिता भरत जितेकर आणि बारावीत केपीसी हायस्कूलचे साहिल संजय वेदपाठक व सीकेटी विद्यालयाची ऋतुजा विकास गुजरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत नावलौकिक मिळवला आहे. त्यानिमित्त त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्माचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सत्कार समारंभाला पंचायत समिती सदस्य काशिनाथ पाटील, वसंत काठवले, गटविकास अधिकारी संजय भोये, गटशिक्षण अधिकारी महेश खामकर, सीकेटी विद्यालयाच्या प्राचार्य इंदुमती घरत, केपीसी हायस्कूलच्या डॉ. छाया, विस्तार अधिकारी बबन म्हात्रे, केंद्र प्रमुख बा. ना. म्हात्रे, विनोद ठाकूर, संदीप भोईर, अभिजित मटकर, चेतन गायकवाड आदी उपस्थित होते.