– अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल सत्र न्यायालयाने फेटाळला
– बनावट कागदपत्रांद्वारे दिलेली बांधकाम परवानगी भोवणार
पनवेल : रामप्रहर वृत्त
बनावट कागदपत्रे तयार करून नैना क्षेत्रात बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणी उसर्ली खुर्द ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल येथील सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. माजी सरपंच प्रमिला भगत व विश्वास भगत यांनी अधिकार बसताना उसर्ली खुर्द ग्रामपंचायतीची बोगस कागदपत्रे व शिक्के तयार करून ग्रामपंचायत हद्दीतील नैना क्षेत्रात अनेक बांधकाम परवानग्या दिल्या होत्या. नैना स्थापन होण्यापूर्वीची तारीख टाकून या परवानग्या दिल्या असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी पडताळणी करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी पनवेलच्या गटविकास अधिकार्यांना उसर्ली खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रमिला भगत व विश्वास भगत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उसर्ली खुर्दचे ग्रामसेवक आर. एम. ढेरे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात माजी सरपंच प्रमिला भगत आणि विश्वास भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने प्राप्त पुराव्याच्या कागदपत्रांची छाननी करून पनवेल शहर पोलिसांनी तत्कालीन सरपंच विश्वास भगत व प्रमिला भगत यांच्याविरुद्ध 1 जुलै 2022 रोजी भा. दं. वि. कलम 420, 465, 466, 468, 471, 473, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर विश्वास भगत व प्रमिला भगत यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पनवेल येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता, मात्र हा अर्ज 7 डिसेंबर रोजी न्यायालयाने फेटाळला आहे. पोलिसांच्या मागणीनुसार आरोपींना कोठडी सुनावून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. माजी सरपंचांनी गुन्ह्यामध्ये नागरिकांची फसवणूक करणे, बनावट सरकारी शिक्के तयार करणे, ग्रामपंचायतीच्या बनावट लेटरहेडचा वापर करणे, सार्वजनिक अभिलेखांचा दुरूपयोग करणे, बनावट दस्त तयार करून तो खरा असल्याचा बनाव करणे, बनावटीकरण करणे आणि बिल्डर, विकसक, वास्तूविषारद यांच्याबरोबर संगनमत करून अनधिकृत इमारत बांधकामांना चालना देणे असे अनेक गैरव्यवहार केले आहेत. या प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे माजी सरपंच विश्वास भगत व प्रमिला भगत यांना अटक होण्याची शक्यता आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper