Breaking News

पनवेल मनपाकडून साथीच्या रोगांवर उपाययोजना

परिसरामध्येहिवताप, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ

पनवेल : वार्ताहर

एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच पनवेलसह खारघर परिसरामध्ये सर्दी, तापाची साथ वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहेे, मात्र नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहन पनवेल महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.  पनवेल महापालिकेकडून आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या साथींच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

खारघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. रुग्ण संख्येत वाढ होत असताना खारघर आणि तळोजा परिसरात हिवताप, डेंग्युच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या ताप आणि सर्दी साथीचा फैलाव होत असून नक्की सर्दी, ताप आहे की कोरोनाची लक्षणे याबाबत संभ्रमावस्था झाली आहे. तळोजामधील काही रुग्णालयात विचारणा केली असता तळोजा मध्ये सर्दी, ताप, हिंवताप आणि डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगण्यात आले. त्यात कोरोनाचे रुग्ण नसून व्हायरल फ्लूची साथ असल्याचे सांगितले गेले.

खारघर, सेक्टर-12 मध्ये महापालिकेचे नागरी आरोग्य केंद्र आहे. या केंद्रात कोरोनाच्या रुग्णांची कोरोना तपासणी केली जात असल्यामुळे नागरिक खाजगी क्लिनिक, रुग्णालयात मोठ्या प्रमाणात तपासणी करून उपचार घेत आहेत. खारघर मधील काही डॉक्टरकडे विचारणा केली असता खारघरमध्ये सर्दी, ताप तसेच हिवताप, डेंग्यू, चिकन गुनियाचे काही रुग्ण आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी महापालिका नागरी आरोग्य केंद्रात विचारणा केली असता, खारघर मध्ये दहा डेंग्यूचे रुग्ण तर चार हिंवतापाचे रुग्ण आढळून आले आहेत. हिवतापाचे रुग्ण तळोजा मधील बांधकाम साईटवर आढळून आले होते.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेने परिसरात बळावलेल्या साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत.

यामध्ये फवारणी आणि धुरीकरण करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये या आजारांविषयी माहिती देणारे फलक व जनजागृती करण्यात येत आहे. तसेच आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी घ्यावयाची काळजी नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या उपयायोजना महापालिका करीत आहे. दरम्यान, रुग्णालयात सर्दी, तापाचे रुग्ण वाढत असल्याने हा व्हायरल फ्लू असून जनतेने घाबरुन जाऊ नये, असे तेथील आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply