अलिबाग : प्रतिनिधी
रस्ता बनवून द्यावा या मागणीकडे दुर्लक्ष करणार्या रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाचे बुधवारी (दि. 6) खालापूर तालुक्यातील करंबेळी ठाकूरवाडी, खडई धनगरवाडा येथील आदिवासी व धनगर बांधवांनी सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध घालून निषेध केला.
खालापूर तालुक्यातील करंबेळी ठाकूरवाडी व खडई धनगरवाडा येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे गावातील रस्त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या रस्त्याला जिल्हा ग्रामीण मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. हरवलेला रस्ता शोधून द्या, या मागणीसाठी तसेच प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या गावांमधील ग्रामस्थांनी आपल्या पोराबाळांसह बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. संतापलेल्या मोर्चेकर्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे श्राध्द घालून आपल्या भावना व्यक्त केल्या.
अलिबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून मोर्चाला सुरवात झाली. एसटी स्थानक, महावीर चौक, बालाजी नाका, मारूती नाका मार्गे हा मोर्चा पोस्ट ऑफीसजवळ दाखल झाला. तिथे तो पोलिसांनी अडविला.या मोर्चात संतोष ठाकूर, संतोष घाटे, उदय गावंड, जयेश शिंदे, अंकुश माडे, यशवंत माडे, सुनिल घाटे, पांडू हिरवा, शुभम माडे, बबलू घाटे, नारायण विर, चंद्रकांत ढेबे आदि सहभागी झाले होते.
राजिप बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भारदेस्कर यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले. ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते, खडई ग्रामस्थ, करंबेळी ग्रामस्थ, आणि जिल्हा ग्रामीण मार्ग क्र.132 शी संबंधित शेतकर्यांची बैठक 14 ऑक्टोबर रोजी खालापूर पंचायत समिती कार्यालयात आयोजित करण्यात येईल, असे असे आश्वासन भारदेस्कर यांनी मोर्चेकर्यांना या वेळी दिले.