शारजा ः वृत्तसंस्था
सुनील नारायणने (4/21 आणि 26 धावा) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चार गडी आणि दोन चेंडू राखून पराभूत केले. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी बुधवारी (दि. 13) होणार्या ‘क्वालिफायर-2’च्या लढतीत कोलकातापुढे दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असेल. बंगळुरूने दिलेले 139 धावांचे आव्हान कोलकाताने 19.4 षटकांत गाठले. शुभमन गिलने (29) फटकेबाजी सुरुवात केल्यावर हर्षल पटेलने त्याला आणि त्याचा सलामीचा साथी वेंकटेश अय्यरला (26) माघारी पाठवले, तर युजवेंद्र चहलने राहुल त्रिपाठीला (6) पायचीत पकडत कोलकाताला अडचणीत टाकले, मात्र नारायण (26) आणि नितीश राणा (23) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. हे दोघे बाद झाल्यावर दिनेश कार्तिक (10), शाकिब अल हसन (नाबाद 9) आणि कर्णधार ईऑन मॉर्गन (नाबाद 5) या अनुभवी त्रिकुटाने कोलकाताला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, शारजाच्या संथ खेळपट्टीवर बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 138 अशी धावसंख्या उभारली. कोहली (39) आणि देवदत्त पडिक्कल (21) यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी करताना पाच षटकांत 49 धावांची सलामी दिली. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने पडिक्कलला बाद करीत ही जोडी फोडली. नारायणने कोहलीसह के. एस. भरत (9), ए. बी. डिव्हिलियर्स (11) आणि ग्लेन मॅक्सवेल (15) या बंगळुरूच्या प्रमुख चौकडीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. यानंतर शाहबाझ अहमद (13) वगळता बंगळुरूच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
संक्षिप्त धावफलक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ः 20 षटकांत 7 बाद 138 (विराट कोहली 39, देवदत्त पडिक्कल 21; सुनील नारायण 4/21, लॉकी फर्ग्युसन 2/30) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स ः 19.4 षटकांत 6 बाद 139 (शुभमन गिल 29, सुनील नारायण 26; युजवेंद्र चहल 2/16).