विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप
नांदेड ः प्रतिनिधी
स्वत:च्या हिश्श्याचे जे 1700 कोटी रुपये राज्य सरकारने भरायला हवे होते, त्यातील एक नवा पैसा त्यांनी भरलेला नाही. तो जर भरला असता तर चार हजार कोटी रुपये राज्यातील शेतकर्यांना देता आले असते, पण जर पैसेच भरले नाहीत, तर विम्याचे पैसे येतील कसे? म्हणजे यांच्याकडे चैनीला पैसा आहे, पण शेतकर्यांना देण्यासाठी हक्काचे पैसे राज्य सरकार भरत नाही आणि म्हणून शेतकरी संकटात आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे देगलूर पोटनिवडणुकीसाठी सोमारी (दि. 25) झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
या सभेला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, राज्यमंत्री भगवंत खुबा, खासदार प्रताप पाटील-चिखलीकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर, राम शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तींचा जोरदार फटका बळीराजाला बसला आहे. या नुकसानीची भरपाई पुरेशा प्रमाणात न मिळाल्याची टीका विरोधी पक्षाकडून सातत्याने केली जात आहे तसेच पीकविम्याची रक्कमही शेतकर्यांना मिळालेली नसल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. याचवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ झालेल्या प्रचार सभेत बोलताना ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
फडणवीस म्हणाले की, भागवत कराड हे वित्तराज्यमंत्री झाल्यावर आम्ही त्यांना विचारले की पीकविमा आपल्या काळात मिळत होता, आता तो का मिळत नाही? यावर त्यांनी विमा कंपन्यांची बैठक बोलावली. त्या विमा कंपन्यांनी धक्कादायक सत्य आपल्यासमोर आणले. त्यांनी सांगितले, राज्य सरकारच्या हिश्श्याचे जे 1700 कोटी रुपये सरकारने भरायला हवे होते, त्यातला एक नवा पैसा त्यांनी भरलेला नाही. मग विमा देणार कसा? तो जर भरला असता तर चार हजार कोटी रुपये आम्ही शेतकर्यांना दिले असते.
फडणवीस यांनी या वेळी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावरही अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. ते म्हणाले, एका मंत्र्याचा जावई गांजा विकताना आढळून आला, पण मंत्री म्हणतो ही हर्बल तंबाखू आहे. मग आमचे सदाभाऊ खोत म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकर्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो, तर शेतकर्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकर्यांना चांगले दिवस येतील.
बायकोने मारले तरी सांगतील यात केंद्र सरकारचा हात आहे
राज्य सरकार स्वतः भ्रष्टाचार करीत आहे आणि मदत द्यायची वेळ आल्यावर केंद्र सरकाकडे बोट दाखवत आहे, असे सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, हे सरकार इतके लबाड आहे की काहीही झाले तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असे वाटतेय यांच्या बायकोने मारले तरी सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे, असा टोला हाणला.
RamPrahar – The Panvel Daily Paper