Breaking News

अझोला वनस्पतीची निर्मिती करा

कोकण कृषी विद्यापीठाचे शेतकर्‍यांना आवाहन;  कर्जत कुशीवलीत विद्यार्थिनींचीप्रात्यक्षिके

कर्जत : बातमीदार

कोकण कृषी विद्यापीठाने बायो फर्टिलायझर म्हणून अझोला वनस्पती विकसित केली आहे. या कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी कर्जत तालुक्यातील कुशीवली येथे जाऊन तेथील शेतकर्‍यांना अझोला वनस्पतीबद्दल माहिती देऊन त्या वनस्पतीच्या निर्मितीचे आवाहन केले.

कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर, ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना प्रमुख डॉ. विजय थोरात, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. नरेंद्र प्रसादे आणि वनस्पतीरोगशास्त्र विभागाचे डॉ. राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयातील कृषी पदविका विद्यार्थिनींनी ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजने अंतर्गत कुशीवली गावात जनजागृती मोहीम राबविली. तेथील संतोष विचारे, दत्तात्रय देशमुख आणि अन्य पाच शेतकर्‍यांच्या उपस्थितीत सुप्रिया सोमनाथ गारे आणि दिव्या राजू देवकर या कृषी विद्यार्थिनींनी अझोला वनस्पतीचे उत्पादन कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली.

अझोला ही वनस्पती एक प्रकारचे जैविक खत म्हणून काम करीत असून भात पिकाच्या उत्पादन वाढीसाठी वापरले जाते. अझोला वातावरणातील नत्र भाताला उपलब्ध करून देते तसेच यामुळे उत्पादनात 20 टक्के वाढ होते. त्याचबरोबर पशूखाद्य म्हणूनही अझोलाचा वापर केला जातो.

गायी व म्हशींना दररोज अझोला खाऊ घातल्याने त्यांच्या दूध उत्पादनात वाढ होते. कोंबड्यांना दररोज अझोला दिल्याने त्यांच्या मांसाच्या प्रमाणात वाढ होते, अशी माहिती देतानाच सुप्रिया गारे आणि दिव्या देवकर विद्यार्थिनींनी या बद्दल प्रात्यक्षिकेदेखील सादर केली.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply