Breaking News

कळंब येथे भाताच्या मोळ्यांना आग

शेतकर्‍याचे दीड लाखाचे नुकसान

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील कळंब येथील शेतकर्‍याने शेतात गोळा करून ठेवलेल्या भाताच्या मोळ्यांना मंगळवारी (दि. 26) संध्याकाळी आग लागली. या आगीत 300 मोळ्या जळून खाक झाल्या. नेरळ पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार ताहीर अब्दुल अजीज लोगडे या शेतकर्‍याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

कळंब येथील ताहीर लोगडे यांची बोरगाव रोडला भातशेती असून सध्या भाताच्या पिकाची कापणी सुरू आहे. त्याची साठवण ताहीर लोगडे हे त्याच भागात करीत होते. मंगळवारी संध्याकाळी ताहीर लोगडे शेतावरुन आपल्या घरी परतले. त्यानंतर त्यांच्या शेत जमिनीत साठवून ठेवलेल्या भाताच्या मोळ्यांना आग लागली असल्याची माहिती त्यांना मिळाली. ताहीर यांच्यासह ग्रामस्थ बोरगाव रोडवरील शेतावर पोहचले, त्यावेळी भाताच्या दोन गंजी यांनी पेट घेतला होता. ग्रामस्थांच्या  प्रयत्नानंतर आठ वाजता आग विझली आणि सर्व घरी परतले. मात्र रात्री पुन्हा आग भडकली आणि त्यात ताहीर लोगडे यांच्या भाताच्या 300 मोळ्या जळून खाक झाल्या.

स्थानिकांनी नेरळ पोलीस ठाणे आणि कर्जत तहसीलदार यांना आगीबाबत माहिती दिली. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. तर बुधवारी सकाळी नायब तहसीलदार यांनी ताहीर लोगडे यांच्या जळालेल्या भाताच्या मोळ्यांची पाहणी केली. नेरळ पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात या आगीत दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply