पेण ः रामप्रहर वृत्त
भंकपबाजीत माहीर असणार्या खासदार सुनील तटकरे यांनी फुसके बार फोडणे बंद करावेत, अशी टीका माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी केली आहे. पेण नगर परिषदेत आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता येईल, असे भाष्य रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथील पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी केले होते. त्याचा आमदार रविशेठ पाटील यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. पेण पालिकेवर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न सुनील तटकरे यांनी पाहू नये. येथे घड्याळाची टिकटिक कदापि चालू देणार नाही, असे प्रत्युत्तर आमदार रविशेठ पाटील यांनी दिले.
खासदार तटकरे केवळ खोटे बोलण्यात आणि खोटी आश्वासने देण्यात पटाईत आहेत, मात्र ते जलसंपदामंत्री असताना त्यांनी पेणचा पाणी प्रश्न सोडविला नाही आणि अर्थमंत्री असताना पेण अर्बन बँकेचा प्रश्न मार्गी लावला नाही. आता ते पेणमधील जनतेचे प्रश्न काय सोडविणार, असा सवाल आमदार रविशेठ पाटील यांनी केला आहे.
आमदार रविशेठ पाटील खासदार तटकरेंना उद्देशून पुढे म्हणाले की, मागील पेण पालिकेच्या निवडणुकीत सर्व पक्ष एकत्र असताना तुम्ही परिवर्तन करू शकला नाहीत, तर या वेळी काय एकहाती सत्ता घ्याल? आधी घड्याळाची निशाणी घेऊन निवडणूक लढवून दाखवा.
सुनील तटकरे यापूर्वी राज्यात मंत्री होते, पालकमंत्री होते, पण पेण खारेपाट भागातील पाणीप्रश्न त्यांना सोडविता आला नाही. त्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विभागासाठी निधी मंजूर केला. याबाबत मी फडणवीसांचे आभार व्यक्त करतो, मात्र याचे श्रेय घेण्याचे काम इतर लोक करतात. त्यांची मला कीव येते, अशा शब्दांत आमदार रविशेठ पाटील यांनी फटकारले.
आम्ही शहरामध्ये केलेल्या विकासकामांची पोचपावती म्हणून पेणमधील सुज्ञ जनता आमची विजयाची हॅट्ट्रिक नक्कीच पूर्ण करून देईल, असा विश्वास शेवटी आमदार रविशेठ पाटील यांनी व्यक्त केला.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …