लातूर : प्रतिनिधी
दिवाळीनंतर सर्व घोटाळे उघड करणार, असा इशारा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला. ते बुधवारी
(दि. 27) लातूर येथील स्वानंद मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सोमय्या या वेळी म्हणाले की, राज्यातील ठाकरे-पवार सरकार हे माफियांचे सरकार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवरील धाडीत तब्ब्ल 16 हजार 50 कोटींची मालमत्ता आढळून आली आहे. त्यामुळे हे सरकार माफियांचे आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माफिया लोक जसे काबिज करतात तसे काम येथे झाले आहे. राज्यातील इतर साखर कारखान्यासारखेच या जिल्ह्यात देखील कारखान्यात घोटाळे झाले आहेत. दिवाळीनंतर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील बालाघाट म्हणजेच आजचा सिद्धी शुगर आणि उदगीर तालुक्यातील तोंडार येथील प्रियदर्शनी हे दोन्ही सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने विकले गेले आहेत. या कारखान्यांसह अर्धाडझनभर सहकारी साखर कारखाने देशमुख परिवाराने गिळंकृत केले आहेत. हा आरोप करीत दिवाळीनंतर हे सर्व घोटाळे उघड करणार असा इशारा सोमय्या यांनी दिला. पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटी प्रकल्प घोटाळ्यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाठपुरावा करण्याबाबत पाठवलेल्या पत्राचेही किरीट सोमय्या यांनी राऊतांना उत्तर दिले आहे. राज्य सरकारने सीबीआयला चौकशी करण्यास सांगावे, आपण पाठपुरावा करू असेही सोमय्या यांनी सांगितले. जरंडेश्वर कारखाना प्रकरणात 184 कोटी संपत्ती सापडली, मात्र शरद पवार आणि अजित पवार हे बनवाबनवी करीत असल्याचा आरोपदेखील सोमय्या यांनी केला आहे. या वेळी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील यांनी जिल्ह्यातील बालाघाट व प्रियदर्शनी कारखाना, जागृती शुगरने साडेअकरा हजार शेतकर्यांची केलेली फसवणूक, जिल्हा बँकेने अनेक संस्थांना कर्ज पुरवठा केला आहे. त्याची चौकशी करावी याची कागदपत्रे सोमय्या यांना सुपूर्द केली. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार आदी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते.