माणगाव : प्रतिनिधी
जुनी पेन्शन योजना लागू करा, प्रमुख मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि. 29) सकाळी माणगावमधील सरकारी कर्मचार्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर एक तासाचे ठिय्या आंदोलन करून निवासी नायब तहसीलदार बी. वाय. भाबड यांना निवेदन दिले.
राज्य शासनाने 1982 ची जुनी पेन्शन योजना रद्द करून 1 नोव्हेंबर 2005 पासून कर्मचार्यांना नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र ती रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे आंदोलन उभारण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद देत संघटनेच्या माणगाव शाखे तर्फे शुक्रवारी तहसीलदार कार्यालयासमोर एक तासाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र दगडू खाडे, सरचिटणीस तुषार सुर्वे, तलाठी संघटने अध्यक्ष श्री. चाटे, मंडळ अधिकारी इंदापूर वैशाली सत्वे, भारती पाटील, माधुरी उभारे, यांच्यासह आरोग्य, महसूल, कृषी, वन विभागातील कर्मचारी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.