Breaking News

वणवे सुरूच आता तरव्यांनी होरपळतोय पोलादपूर तालुका

पोलादपूर तालुक्यात मार्गशीर्ष महिन्यापासून सुरू झालेले वणवे आता चैत्र महिन्याच्या मध्यावरही सुरू असून चैत्रपालवी फुटण्यापूर्वी कवळं काढण्यासाठी राब काढल्यानंतर पारंपरिक शेतीचा एक अविभाज्य भाग म्हणून शेतात जाळले जाणारे तरवे आणि उन्हाची झळ यामुळे होणारी तापमानवाढ यंदा अधिक झळ सोसावयास लावणार आहे. या उष्म्यासोबत दिवसा-दुपारी तब्बल 32 ते 40 अंश सेल्सियस तापमान वाढल्याचे दिसून येत आहे.

शेतीच्या मशागतीसाठी झाडांच्या नव्या फांद्या आणि पानांची कवळं काढून त्याचे शेतजमिनीवर राब पेटवून शेतीची मशागत करण्याची ही पारंपरिक पद्धत पोलादपूर तालुक्यात सर्वत्र रूढ झाली आहे. यामुळे थेट सूर्यप्रकाशामुळे शेतजमिनीच्या मातीमध्ये नवीन पिकाच्या वाढीसाठी निर्माण होणारे सिलीकॉनीयस गुणधर्म असलेले पोषक द्रव्य संपूर्ण जळून जात असल्याचे आधुनिक कृषी तंत्रज्ञान सांगते. पोलादपूर तालुक्यात कवळं काढून राब पेटविण्याचा हंगाम आता सुरू झाला आहे. अनेक शेतामध्ये शेण, फांद्या, पानं असा राब अंथरला गेला आहे. यात सागवानी झाडांच्या पानांचा आणि कोवळ्या फांद्यांचा राबामध्ये जास्त उपयोग झाल्याचे दिसून येत आहे. यालाच कवळं काढणे असे म्हणतात. यामुळे सागाची झाडं बोडकी झाल्याचेही दृश्य सर्वत्र दिसून येत आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी कवळं तोडताना 4-5 शेतकर्‍यांना हकनाक विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जीव गमवावा लागल्याचे दुर्दैवी सत्य तालुक्याला अनुभवावे लागले आहे. एकीकडे सागाची पाने जमिनीमध्ये विघटित होऊन त्यांचे मातीत रूपांतर होण्यास जास्त अवधी लागत असल्याचे कृषीविज्ञान सांगते. त्यामुळे सागमाफियांना हा हंगाम शेतीच्या मशागतीच्या निमित्ताने सागाची अवैध वृक्षतोड करण्यास प्रोत्साहित करणाराही ठरत आहे.

अलीकडेच लोहारे देऊळवाडीतील गोठा वणव्याच्या विळख्यात सापडून दोन बैल भस्मसात झाले. सवाद येथे एका गवताची उडवी जळण्याचा तर कापडे फौजदारवाडीसह धामणदिवी, सडे, सवाद, कोतवाल बुद्रुक आणि कोंढवी येथे वाडा जळून गुरे होरपळल्याच्या दुर्घटना गेल्या दोन वर्षांत झाल्या आहेत. तालुक्यात संध्याकाळी उंच डोंगरावर विद्युत रोषणाई केल्यासारखे वणव्यांचे दृश्य मनोहारी दिसत असले, तरी हे वणवे भर दुपारी जेव्हा पेटतात तेव्हा पाणीटंचाई असलेल्या या तालुक्यात शेतकर्‍यांना त्यावर नियंत्रण ठेवणे देखील अशक्य होत आहे. पोलादपूर तालुक्यातील माळरानावरील गवताचे प्रमाण पाहता ते तालुक्याला पशुधन संगोपनासाठी दुधदुभता तालुका अशी ओळख देण्यास उपयुक्त आहे, मात्र तरीही नेमेचि येतो मग पावसाळा… प्रमाणे दरवर्षी लागतात येथे वणवे… असा दाहक अनुभव शेतकरी घेताना दिसत आहेत.

तालुक्यातील कृषी विभाग याबाबत शेतकरी वर्गात प्रबोधन करण्याच्या मानसिकतेत नाही. वास्तविकतः पावसाळी पीक घेऊन झाले की जमीन ओलसर असतानाच शेताची नांगरणी केल्यानंतर सूर्यप्रकाश आणि सूर्यकिरणे थेट जमिनीत मातीमध्ये शिरून माती भुसभुशीत होण्यास मदत होतेच; पण यासोबतच नंतरच्या पिकासाठी पोषक अशा सिलीकॉनीयस द्रव्याची निर्मिती होऊन पिके जोमाने वाढतात; हा कृषी विज्ञानाचा शोध तालुक्यातील तापमानवाढीसोबतच धुरामुळे होणार्‍या प्रदूषणावरही नियंत्रण मिळविण्यास साह्यभूत ठरणार आहे. याखेरीज जगाला भेडसावणारी जागतिक तापमानवाढीची म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगची समस्यादेखील यामुळे पोलादपूरचे तापमान वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. वातावरणाचे संतुलन बिघडविण्यास हे राब जाळण्याची मशागतीची पारंपरिक पद्धत मदत करीत आहे.

मनुष्यबळ कमी असल्याने गाई गुरे सांभाळून शेतकरी रोजगार निर्मितीस अनुकूल नसून पोरांच्या मुंबईतील पगारातून मनिऑर्डरची वाट पाहण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळे गुरांअभावी हिरवा चारा कापण्याचे कष्ट कोणीही घेताना दिसून येत नाही. 15 वर्षांपूर्वी गवत कापणी करून मुंबईसह देशातील तबेल्यांमध्ये गवतपुरवठा करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना साथ देणार्‍या पोलादपूरकरांना गवताचा आणि मेहनतीचाही पैसा मिळाला नव्हता; त्यामुळे गवतकापणीसाठी कोणीही अनूकूल नाही. जत्रोफा लागवड करण्याचे आमिष दाखविणार्‍यांनी ‘पेरले बी आणि उगवले गवत’ अशी फसवणूक केल्याने शेतकरी आता भातशेती आणि रबी हंगामातील भाजीपाल्याखेरीज कोणतेही उत्पादन घेत नसल्याने अन्य शेतकरी बांधावरील गवत कापायलादेखील शेतावर या हंगामात फिरकत नाहीत. पोलादपूर तालुक्यात मुबलक असलेल्या गवताचा वापर करून पशूखाद्यासह पुठ्ठे व कोरूगेटेड बॉक्सची निर्मिती करण्यासाठी आवश्यक लगदा या गवतापासून तयार करण्याचे कृषीपूरक उद्योग शक्य असूनही त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न होत नसल्याने दरवर्षी हजारो टन वणव्यामुळे जळून खाक होत आहे. यासोबतच आता लोकवस्तीकडे आणि शेतीवाडीकडे वणव्याच्या आगीचे लोट पसरून गेल्या काही वर्षांपासून घरे आणि गुरांचे वाडेदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडू लागल्याच्या दुर्दैवी घटना सातत्याने घडू लागल्या आहेत, मात्र या सर्व नुकसानग्रस्तांना कितपत सरकारी मदतीचे सहकार्य मिळाले, याबाबतची आकडेवारी सरकारमार्फत अद्याप जाहीर न झाल्याने वणवे आणि तरव्यांपासूनच्या या नुकसानीच्या घटनांना आपत्ती गृहित धरले जात नसल्याची बाबही दुर्दैवी मानावी लागणार आहे.

तालुका कृषी कार्यालय आणि पंचायत समितीच्या कृषी विभागासह विविध समाजाच्या पुढार्‍यांनीही तालुक्यातील राब जाळण्याच्या पारंपरिक जुन्या मशागतीबाबत ग्रामीण जनतेचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज, गवत कोवळे असतानाच माळावरून काढून पशूधन संवर्धनासाठी वापर झाला, तर दरवर्षी वणवे लागण्याच्या प्रमाणात घट होऊन हवेमधील अचानक वाढणारा उष्मा कमी होऊ शकणार आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply