Breaking News

राज्यात मोठा दूध घोटाळा; भाजपच्या विखे-पाटील यांचा आरोप

अहमदनगर : प्रतिनिधी

मागील भाजप सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिले होते, मात्र शेतकर्‍यांना अनुदान न देता अनेक दूध संघांनी ते पैसे हडप केले आहेत. संगमनेरमधील एका दूध संघाने तर शेतकर्‍यांचेच आधी कापून घेतलेले पैसे त्यांना परत देत अनुदान दिल्याचे भासविले. अशा दूध संघांचा नागपूरच्या हिवाळी अधिवेशात भंडाफोड करणार आहोत, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला. त्यांनी संगमनेरमधील दूध संघाचे नाव घेऊन थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेच इशारा केला आहे.

राहुरी तालुक्यातील एका दूध संघाच्या कार्यक्रमात विखे बोलत होते. त्या वेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. विखे पाटील म्हणाले, कोरोना काळात अधिवेशनाला मर्यादा होत्या. त्यामुळे अनेक प्रश्न असूनही ते मांडता येत नव्हते. कोरोनाच्या नावाखाली सरकारने अनेक गोष्टी रेटून नेल्या. आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने नागपूरमधील हिवाळी अधिवेशन पुरेसा काळ चालेल अशी अपेक्षा आहे. त्या वेळी दूध संघांनी शेतकर्‍यांची कशी फसवणूक केली, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले, याचा आपण भांडाफोड करणार आहोत. दुधाचे दर कोसळल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत होते. त्यामुळे तत्कालीन सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिले, मात्र अनेक दूध संघांनी हे पैसे प्रत्यक्ष शेतकर्‍यांना दिलेच नाहीत. त्यांचा अधिवेशनात भांडफोड करणार आहे. संगरनेरमधील एका सहकारी दूध संघाने शेतकर्‍यांकडून वर्षभर दुधाचे पैसे कापले. नंतर तेच त्यांना परत दिले. शेतकर्‍यांकडून घेतलेले पैसेच परत देत अनुदान दिल्याचे सांगितले. ही गोष्ट तेथील शेतकर्‍यांच्याही लक्षात आली आहे. या विरोधात शेतकरी आंदोलन करणार आहेत, असे सांगत विखे-पाटील यांनी थोरात यांच्याशी संबंधित दूध संघाकडेच इशारा केला आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने टीका करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांच्यावरही विखे-पाटील यांनी टीका केली. मलिक यांनी जावयाकडे सापडलेला पदार्थ म्हणजे हर्बल तंबाखू असल्याचे म्हटले होते. त्यावरून विखे पाटील यांनी टोला हाणला. विखे-पाटील म्हणाले, ‘मलिक यांनी शोधलेल्या या वनस्पतीची माहिती शेतकर्‍यांना द्यावी. तिची लागवड करण्याची परवागी देत बियाणेही उपलब्ध करून द्यावे. यातून शेतकर्‍यांचे उत्पन्न तरी वाढले. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अशी मागणी करीत आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात फक्त हा एकच विषय चर्चेत आहे. यामुळे इतर विषय मागे पडले आहेत, अशी टीकाही विखे-पाटील यांनी केली.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply