
खोपोली : प्रतिनिधी
भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तान जिंकल्याच्या संदर्भात सोशल मीडियावर खालापूर तालुक्यातील एका तरुणाने आक्षेपजनक पोस्ट टाकली. ती पोस्ट झपाट्याने वायरल झाल्यानंतर खोपोलीमध्ये याबाबत तणाव निर्माण झाला. या पोस्टला आक्षेप घेत मंगळवारी (दि. 2) सकाळी खोपोली पोलीस ठाण्यावर अनेक तरुणांनी धडक देत, संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली.
दरम्यान, संबंधित तरुण खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी तरुणांच्या शिष्टमंडळाला खालापूर पोलीस ठाण्यात जाण्याविषयी सांगितले. मात्र तरीही बराच काळ तरुणांनी खोपोली पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. खोपोली पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा संताप अनेकांनी व्यक्त केला. मात्र खोपोली पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर तरुणांनी खालापूर पोलीस ठाणे गाठत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले.
यासंदर्भात खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभुते यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या तक्रारीबाबत पोलिसांनी काय भूमिका घेतली हे उशिरापर्यंत कळू शकले नाही.