Breaking News

प्रकल्पग्रस्तांवर सिडकोकडून अन्यायाचा कहर

धूतूमच्या दत्तू भिवा ठाकूर यांची प्रकृती चिंताजनक

पनवेल ः रामप्रहर वृत्त
आपल्या हक्कांसाठी वारंवार सिडकोकडे मागणी करणार्‍या प्रकल्पग्रस्तांकडे सिडको ढुंकूनही पहात नसल्याचे दत्तू भिवा ठाकूर या वयोवृद्ध प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दत्तू ठाकूर यांची प्रकृती चिंताजनक आहे, मात्र सिडकोला प्रकल्पग्रस्तांच्या वेदनेपेक्षा बांधकामही सुरू न झालेल्या विमानतळाच्या नामकरणात अधिक स्वारस्य असल्याचे दिसून आले.
उरण तालुक्यातील धुतूम गावचे प्रकल्पग्रस्त शेतकरी दत्तू ठाकूर यांनी सोमवारी (दि. 1) सिडको भवनातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सीबीडी बेलापूर येथील एमजीएम रूग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या आंदोलनातील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जाणारे 80 वर्षांचे दत्तू ठाकूर प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत. त्यांनी यापूर्वीही सिडकोला वारंवार लेखी सूचना देऊनदेखील सिडकोच्या अधिकार्‍यांनी इतर प्रकल्पग्रस्तांप्रमाणे त्यांच्याकडेही दुर्लक्षच केले. त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी दत्तू ठाकूर यांनी हे स्पष्ट केले की, माझ्यावर कोणतेही कर्ज नाही तसेच मी कर्जमाफीसाठीही आत्महत्या करीत नाही. मला माझ्या हक्काच्या लढ्याला न्याय मिळावा म्हणून मी आत्महत्या करीत आहे. या घटनेची माहिती पनवेल-उरणसह इतर भागांतील प्रकल्पग्रस्तांना मिळाली असता, त्यांच्याकडूनही संतापाची भावना व्यक्त होऊ लागली आहे. सिडको आता आमचा अंत किती पाहणार आहे, असेही प्रकल्पग्रस्त शेतकरी बोलू लागले आहेत.
सिडकोकडे गेली अनेक वर्षे साडेबारा टक्के विकसित भूखंडाची मागणी लेखी पत्र, निवेदने देऊन अधिकार्‍यांनी कोणतीही दाद न दिल्याने अखेरीस दत्तू ठाकूर यांनी टोकाचे पाऊल उचलून सिडको भवनातच आत्महत्येचा प्रयत्न केला. नियाजी जमिनीचे मालक वा कुळ असणार्‍यांचा साडेबारा टक्क्यांच्या योजनेत समावेश होणार नाही, अशी भूमिका घेऊन सिडकोने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना दाद देणेच बंद केले.
आमदार प्रशांत ठाकूर हे सिडकोचे अध्यक्ष असताना एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. द्रोणागिरी परिसरातील ग्रामस्थांना त्या परिसरात विकसित भूखंड देणे शक्य नव्हते. त्यामुळे गव्हाण फाटा परिसरात ‘बटरफ्लाय झोन’ तयार करून तेथे विकसित भूखंड द्यावेत, असा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्यानंतर सिडकोकडून काहीच कारवाई झाली नाही.
व्यावसायिक ‘लाभाच्या’ भूखंडाबाबत उत्साही असलेले सिडकोचे अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर मात्र उदासीन भूमिका घेतात आणि वारंवार आपल्या हक्काच्या जागेसाठी कायदेशीर मागणी करणारे दत्तू ठाकूर यांना मात्र आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागतो, असे दिसून येत आहे.

सिडको प्रशासन आता प्रकल्पग्रस्तांची पर्वा करीत नसल्याचे दत्तू ठाकूर यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीवरून दिसते. विमानतळाचे कामही सुरू झालेले नसताना विमानतळाला नाव देण्याची घाई करणार्‍या सिडकोला प्रकल्पग्रस्तांची वर्षानुवर्षाची प्रतीक्षा संपवायला वेळ मिळत नाही, ही दुर्दैवाची आणि संतापजनक बाब आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष भाजप

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply