पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली गावात माकड व वानरांनी मागील काही महिन्यांपासून उच्छाद घातला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या माकडांनी हल्ले करून काही नागरिकांना जखमी केले आहे. त्यामुळे या माकडांची दहशत माजलीय. या वानर व माकडांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी विद्येश आचार्य यांनी वनविभाग व तालुका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पालीमधील राम आळी, बाजारपेठ, देऊळवाडा, मधली आळी, खडकाळी, कासार आळी, सोनार आळी, आगर आळी, बेगरआळी, उंबरवाडी, सावंतआळी अशा गजबजलेल्या भागात माकडे आणि वानरे रोज धुमाकूळ घालत आहेत. मोठमोठी वानरे आणि माकडे छतावर उड्या मारून घराचे पत्रे व कौले फोडतात. तसेच ड्रेनेजचे पाईप, विजेच्या तारा, गच्चीत ठेवलेले सामान, पाण्याच्या टाक्या, झाडाच्या कुंड्या, झाडे यांचे अतोनात नुकसान करीत आहेत. त्यांच्या या उपद्रवामुळे झाडे, फळे, फुले यांचे नुकसान होत आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. घराबाहेर वाळवण घालता येत नाही. इतकेच नव्हे तर घराची दारे, खिडक्या पण उघड्या ठेवणे अवघड झाले. घरात शिरून माकडे अन्नधान्य, भाजीपाला यांची नासाडी करीत आहेत. वाळत घातलेले कपडे फाडून टाकतात. यामुळे आर्थिक हानी होत आहे. अनेकदा ही माकडे वाहनांवरदेखील उड्या मारतात, तर कधी टेरिस च्या पत्र्यावर धुडगूस घालतात, या माकडांना रोखण्याची गरज आता नागरिकांमध्ये व्यक्त होतेय.
माकडे आणि वानरे यांना पकडण्याची कोणतीही तरतूद वनविभागाकडे नाही. ग्रामपंचायत किंवा देवस्थान यांच्या आर्थिक मदतीतून माकडे पकडणारी टीम बोलवता येऊ शकते. नागरिकांनी माकडांना घरचे तसेच शिजविलेले अन्न खाण्यास देऊ नये. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. त्यामुळे माकडांचा उपद्रव आटोक्यात येऊ शकेल, असे वनविभागाच्या पाली कार्यालयामार्फत सांगण्यात आले.