Breaking News

भरती, अवकाळी पावसाने उडवे भिजले

पेण तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पेण : प्रतिनिधी

दिवाळी लक्ष्मीपूजन आमावस्येच्या दिवशी समुद्रात आलेली मोठी उधाण भरती व अवकाळी पावसाचा फटका पेण तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. खार्‍या पाण्यात भात पिकाचे उडवे भिजल्याने कणे, वाशी, सरेभाग, दिव, वढाव येथील शेती व शेतकर्‍यांचे ऐन दिवाळी सणात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

उधाण भरतीचे पाणी व अवकाळी पावसामुळे पेण तालुक्यातील तब्बल 125 ते 150 एकर भातशेतीचे नुकसान झाले आहे. तहसीलदार कार्यालयाने याची नोंद घेऊन पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांनी   केली आहे.

हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरी सर्तक होता. मात्र दिवाळी अमावस्येला समुद्रात मोठी उधाण भरती आली होती. या वेळी उघाडीचे दरवाजे उघडे राहिल्यामुळे उधाण भरतीचे पाणी शेतात बांधून ठेवलेल्या भार्‍यांच्या उडव्यांभोवती जमा झाले. त्यामुळे या उडव्यांच्या तळाशी लावलेले भात पिकाचे भारे भिजले. हे भारे कोंब फुटून खराब होणार आहेत. याशिवाय वरच्या भार्‍यांनी पाण्याचा ओलावा खेचल्यास आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे. या भिजलेल्या भाताचे 60 ते 70 भार्‍यांची झोडणी केल्यास 7.50 ते 8.00 क्विंटल भातपिकांच्या उत्पन्नावर शेतकर्‍यांना पाणी सोडाव लागणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे.

ऐन दिवाळी सणात नैसर्गीक प्रकोपाचे धक्क्यांवर धक्के शेतकर्‍यांना लागोपाठ सहन करावे लागत आहेत. दिवाळी पाडवा साजरा करताना अवकाळी पाऊस आणि समुद्रात आलेल्या मोठ्या उधाण भरतीने पेण तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठा आर्थिक नुकसानीचा धक्का दिला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply