Breaking News

सेवाभावाचा मूलमंत्र

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे देश पातळीवर विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. बुडत्याला काडीचा आधार बहुदा यालाच म्हणत असावेत. या पक्षांच्या कित्येक नेत्यांना ताबडतोबीने आगामी विधानसभा निवडणुका, तसेच पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याची स्वप्ने पडू लागली असून त्यांच्यापैकी अनेकांनी अगदी आकडेवारीसह आपल्या विजयाचे भाकीतही करून टाकले आहे, परंतु अशा वल्गनांचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर यत्किंचितही परिणाम होण्याची शक्यता नाही.

भाजप हा सेवा, संकल्प आणि समर्पण या मूल्यांशी जोडलेला पक्ष आहे, असे पक्षाचे अतिशय समर्पक वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केले. या मूल्यांच्या बळावरच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष पुन्हा देदिप्यमान कामगिरी करेल याविषयी तीळमात्र शंका नाही. भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष आणि सामान्य जनता यांच्यातील विश्वासाचा सेतू बनावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी या वेळी केले. भारतीय जनता पक्षाविषयी जनतेच्या मनात गैरसमज आणि विखार पेरण्याची इवलीशी संधीही विरोधक आणि त्यांचे समर्थक सोडत नाहीत. पोटनिवडणुकांतील किरकोळ यशावरून थेट पुढील सार्वत्रिक निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या पराभवाचे आडाखे बांधणे हा याच कारस्थानी वृत्तीचा खेळ आहे, परंतु पक्ष कार्यकर्त्यांनी या खेळाकडे दुर्लक्ष करून आपल्या वर्षानुवर्षांच्या सेवाभावी वृत्तीने जनतेच्या प्रश्नांसंदर्भात आपले काम सुरू ठेवावे. भाजप हा कुटुंबकेंद्रित पक्ष नाही. समाजसेवा आणि समर्पण हीच या पक्षाच्या कार्यकर्त्यांची संस्कृती राहिली आहे. कोरोना काळात भाजप कार्यकर्त्यांनी देशभरात अखंड सेवेतून जनतेला या कठीण समयी मोठा हात दिला. जनता या आधाराकडे पाठ फिरवणार नाही. ताज्या पोटनिवडणुकांमधील अपयशाबरोबरच काही ठिकाणी भाजपची कामगिरी चांगलीही राहिली, परंतु विरोधक व प्रसारमाध्यमांतील त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण अशी आवई अकारण उठवली. वास्तवत: आसामात भाजपने आपल्या मित्रपक्षांसोबत पाच जागांवर विजय मिळवला, तर मध्य प्रदेशातही पक्षाची कामगिरी बरी राहिली, परंतु विरोधकांनी त्याबद्दल अवाक्षर काढलेले नाही. वास्तवत: पोटनिवडणूक आणि सार्वत्रिक निवडणूक यांच्यात खूप अंतर असते. पोटनिवडणुकीत बहुतेकदा स्थानिक वा तात्कालिक भावनिक मुद्दे महत्त्वाचे ठरतात. हे घटक विचारात घेतल्यास काँग्रेसच्या या पोटनिवडणुकीतील यशाला खरोखरीच किती महत्त्व आहे हे सहज ध्यानात येते, परंतु या तोकड्या यशानेही जर काँग्रेस पक्षाच्या गोटात सुखावह वारे वाहात असतील तर त्याला कोण काय करणार? त्यातूनच भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असे मथळे काही प्रसारमाध्यमांमध्ये अवतरले असावेत, परंतु भाजपच्या नेतृत्वाने या अशा टिमकी वाजवणार्‍यांची अजिबात दखल घेतली नसून उलट येत्या वर्षातील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षच बाजी मारेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. नेहमीच्या नियोजनबद्ध रीतीने पक्षाचे काम सुरूही राहील. पक्षाने संघटना विस्ताराचे उद्दिष्ट ठेवले असून 25 डिसेंबरपर्यंत देशातील सर्व दहा लाख 40 हजार मतदान केंद्रनिहाय पक्ष समित्या नेमण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जनतेला भेडसावणार्‍या मुद्द्यांना भाजपने नेहमीच अग्रक्रम दिला आहे. त्यानुसार पक्ष कार्यकर्त्यांनी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे लक्ष दिले पााहिजे. भाजपचा सर्वोच्च उत्कर्ष अद्याप बाकी आहे आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या सेवाभावी योगदानातूनच तो साध्य होऊ शकणार आहे.

Check Also

नवकेतन फिल्म @ 75 : चित्रपट इतिहासातील मानाचे स्थान

मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी मराठी चित्रपटांचे विशेष खेळ महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये आयोजित …

Leave a Reply